जळगाव : नरेंद्र मोदी आज रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास ३० ते ४० मंत्री देखील शपथ घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. यात महाराष्ट्रातून रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना मंत्रीपद मिळणार आहे. यासाठी खडसे परिवार खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाला आहे.
रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 रोजी झाला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाले होते. निखिल खडसे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर रक्षा खडसे यांनी राजकारणात पाऊल ठेवले. त्यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
2011 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनिष जैन यांनी एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांचा पराभव केला होता. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच निखिल खडसे यांचे अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रक्षा खडसे यांनी 2014 च्या निवडणुकीत एकप्रकारे आपल्या दिवंगत पतीच्या पराभवाचा वचपा काढला होता.
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी रावेर मतदारसंघातून मनिष जैन यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती. भाजपकडून हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी मिळालेली होती. अशात, खडसेंच्या शब्दाखातर हरिभाऊ जावळेंची उमेदवारी रद्द झाली. त्यांच्याऐवजी खडसेंच्या सून रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत रक्षा खडसे यांनी मनिष जैन यांचा दणदणीत पराभव केला होता. आता रक्षा खडसे या 2014 , 2019 आणि २०२४ अश्या तीन टर्म भाजपच्या खासदार झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळणार असून, यासाठी खडसे परिवार खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाला आहे.
दरम्यान, रक्षा खडसे यांना मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर त्या प्रायव्हेट विमानाने कुटुंबासह दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत. आता रक्षा खडसे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांना आनंद झाला आहे. परिवारातील एक सदस्य केंद्रातील मंत्रिमंडळात जातोय याचा आनंद गगनाला भिडनारा आहे. त्या केंद्रात मंत्रिमंडळाची शपथ घेणार असल्याने माझे हृदय भरून आले आहे. त्यांनी भाजपमध्ये आणि पक्षश्रेष्ठींवर निष्ठा ठेवली त्याचे हे फळ मिळाले आहे. माझ्याकडे आज बोलायला शब्द नाही मन भरुन आले, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
कोण आहेत रक्षा खडसे ?
नाव : श्रीमती. रक्षा निखिल खडसे
जन्म तारीख : 13/05/1987
वय : 37 वर्षे
शैक्षणिक पात्रता : बी. एससी (संगणक शास्त्र)
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, गुजराथी, इंग्लिश
पतीचे नाव : स्वर्गीय. निखिल एकनाथराव खडसे (जिल्हा परिषद सदस्य- 2007 ते 2012)
सासऱ्यांचे नाव : एकनाथ खडसे (माजी मंत्री, महसूल आणि कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य)
पक्ष कार्य : २०१० पासून
राजकीय कार्य पुढीलप्रमाणे
1. सरपंच कोथळी, तालुका. मुक्ताईनगर, जिल्हा- जळगाव, महाराष्ट्र.
2. जिल्हा परिषद – जळगाव जिल्हा सदस्य आणि अध्यक्ष ( सभापती) आरोग्य विभाग, शिक्षण आणि क्रीडा समिती जिल्हा परिषद, जळगाव,
3. 2014 ते 2019 पर्यंत पहिल्यांदा खासदार
4. 2019 te 2014 पर्यंत दुसर्यांदा खासदार
5 . 2024 साली तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या.
संसदेतील समितीच्या सदस्य
1. माहिती व तंत्रज्ञान
2. महिला सक्षमीकरण
3. इतर मागासवर्गीय कल्याण ( ओ बी सी )
4. सल्लागार समिती एम/ओ संस्कृती आणि पर्यटन
5. नेशनल इंस्टिट्यूट ऑफ फैशन बोर्ड ऑफ गव्हर्नन्स तंत्रज्ञान (NIFT)
6. आंतरराष्ट्रीय संसदीय मंच जिनिव्हाचे बोर्ड सदस्य, स्विट्झरलँड
7. सल्लागार समिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयावरील सल्लागार समिती.
‘या’ देशांमध्ये दिली आहे भेट
1. दक्षिण आफ्रिकेतील युवा संसदेसाठी भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणारे एकल सदस्य शिष्टमंडळ.
2. चेवेनिंग पार्लियामेंट प्रोग्राम सदस्य म्हणून लंडन यूनायटेड किंगडम ला भेट दिली.
3. लोकसभा स्पीकर मा. सुमित्रा महाजन यांचा नेतृत्वामध्ये भारतीय शिष्टमंडळाचे सदस्यत्व, रशिया.
4. महाराष्ट्र ट्रेड प्रमोशन, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका
5. भाजपचे राजकीय संशोधन, पीपल्स रिपब्लिक ऑफ चीन
6. माद्रिद स्पेन आयपीयूच्या 143 व्या असेंबलीला उपस्थिती
8. इंडोनेशिया, बाली आयपीयूच्या 144 व्या असेंबलीला उपस्थिती.