MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार

MPSC News : एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. थोड्याच वेळात याबाबत अधिकृत घोषणा होईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तत्वतः मान्यता!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती आहे.

यूपीएससीच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं होतं. अलका टॉकीज चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

13 जानेवारीला देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. आज  एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर आले आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. यावेळी फडणवीस यांनी हा विषय आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल आणि निर्णय घेऊ अशी आश्वासन दिलं होतं.