Mumbai : अंतर्वस्त्रात लपवून आणले ९ कोटींचे ड्रग्ज; झाडाझडती घेताच अधिकारीही चक्रावले

Mumbai : मागील काही महिन्यांपासून मुंबईसह राज्यात अंमली पदार्थ तस्करी आणि विक्रीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हीच बाब लक्षात घेता पोलिसांनी तस्करांविरोधात विशेष मोहिम हाती घेतली आहे. तरी देखील तस्कर वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. मंगळवारी (१९ डिसेंबर) महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई विमानतळावर एका परदेशी महिलेला बघितलं.
या महिलेला पाहून अधिकाऱ्यांना संशय आला. तिला थांबवून झाडाझडती घेतली असता, अधिकारी देखील चक्रावून गेलेत. महिलेने अंतर्वस्त्रात ८९० ग्रॅम ड्रग्ज लपवून आणले होते. या ड्रग्जची किंमत तब्बल ९ कोटी रुपये असल्याचं समोर आलं.

हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच अधिकाऱ्यांनी महिलेला तातडीने अटक केली. अधिकाऱ्यांच्या या धाडसी कारवाईचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली महिला युगांडा देशातील रहिवासी आहे.
मंगळवारी ही महिला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली होती. दरम्यान, या महिलेला पाहून अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी तात्काळ तिला थांबवत तिची झाडाझडती घेतली असता, महिलेने डोक्यावरील विगमध्ये तसेच अंतर्वस्त्रात ड्रग्ज लपवून आणल्याचे उघड झाले.

अंमली पदार्थ तस्करीसाठी महिलेने लढवलेली ही अनोखी शक्कल पाहून डीआरआयचे अधिकारी देखील चकित झाले. त्यांनी तातडीने या महिलेला ताब्यात घेतली. सध्या अधिकारी तिची कसून चौकशी करत असून महिलेमागे नेमका कुठल्या टोळीचा हात आहे, याचाही शोध घेतला जात आहे.