मुंबईला पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा धोका ? धक्कादायक कारण समोर

मुंबई : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दहशतवाद्यांकडून कुलाबा येथील चाबड हाऊसचे गुगल फोटो सापडले आहेत. यामुळे यंत्रणा संतर्क झाल्या असून चाबड हाऊसच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, कुलाबा येथील चाबड हाऊसचे काही गुगल फोटो संशयित आरोपींकडून सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर चाबड हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. चाबड हाऊसमध्ये आधीच अतिशय उच्च सुरक्षा आहे.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या लक्ष्यांपैकी एक असलेल्या चाबड हाऊसचे गुगल फोटो दहशतवाद्यांकडे सापडले आहेत. या दोन आरोपींना हल्ल्याचा कट रचल्याबद्दल राजस्थानमधून अटक करण्यात आली. दरम्यान, या घडामोडीनंतर पोलिसांनी कुलाबा येथील ज्यू कम्युनिटी सेंटरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मुंबई पोलिसांना या संदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलिसांकडून मॉकड्रीलही सुद्धा घेण्यात आलं.

एटीएसने काही दिवसांपूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. हे दोघेही राजस्थानमधील रतलाम येथील असून ते आता महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहेत. या दोन्ही आरोपींवर NIA कडून पाच लाख रुपये बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलेली होतं. त्याचबरोबर हे आरोपी अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा तपासात निष्पन्न सुद्धा झालं आहे.