मुंबई : मुंबई इंडियन्सची धुरा यशस्वीपणे सांभाळणारा रोहित शर्मा पदावरून पायउतार होताच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. एकीकडे मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मा कायमच आमचा कर्णधार राहील, अशी भावनिक पोस्ट शेअर केली असताना नेटिझन्सला मात्र संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय फारसा पटलेला दिसत नाही. त्यामुळे हा निर्णय जाहीर झाल्यानंतर पहिल्या तासाभरातच मुंबई इंडियन्सला लाखो फॉलोअर्सचा फटका बसला आहे. मोठ्या संख्येनं चाहते मुंबई इंडियन्सचं इन्स्टाग्राम अकाऊंट अनफॉलो करत आहेत.
रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून घोषणा होताच चाहत्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. हार्दिक पंड्याचं नाव मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून जाहीर होताच पहिल्या तासाभरात त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. तब्बल चार लाख चाहत्यांनी मुंबई इंडियन्सचं इन्स्टाग्राम अकाऊंट अनफॉलो केलं आहे.
दरम्यान, एकीकडे मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया खात्यांवर चाहत्यांचा रोष दिसून येत असताना वेबसाईटवरही रोहित शर्माच्या चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. रोहित शर्मालाच पुन्हा कर्णधार करावं, अशी मागणी करणाऱ्या असंख्य पोस्ट वेबसाईटवर दिसून येत आहेत. त्याशिवाय, हार्दिक पंड्या कर्णधारपद सांभाळू शकणार नाही, अशाही काही पोस्ट दिसून येत आहेत. त्यामुळे रोहित शर्माला कर्णधार करणं चाहत्यांना फारसं रुचलेलं नसल्याचंच दिसून येत आहे.