मुंबई : ’वर्ल्ड स्लीप डे’ म्हणजेच ‘जागतिक निद्रा दिन’ जगातील ८८हून अधिक देशांमध्ये दि. १७ मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने अपेक्स हॉस्पिटल समूहातर्फे एक सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसार मुंबईतील लोकलमधून प्रवास करणारे मुंबईकर आठवड्याला ३ तास आणि महिन्याभरात सुमारे १२ तास झोप पूर्ण करत असल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे.
सुदृढ आरोग्यासाठी झोप किती महत्त्वाची आहे व ती न मिळाल्यास काय दुष्परिणाम होतात, याबाबत अपेक्स हॉस्पिटल समूहातर्फे एक कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेत अपुरी झोप व त्यापासून होणारे विविध मानसिक व शारीरिक आजारावर अपेक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील ईएनटी आणि व्हॉईस सर्जन-लॅरिन्गोलॉजिस्ट डॉ. बिन्ही देसाई यांनी मार्गदर्शन केले. आज थेट पालघर विरार डहाणू तसेच कर्जत कसारा व पनवेल रसायनी येथून मुंबईत नोकरी-व्यवसायाकरिता येणारे लाखो नागरिक आहेत. या नागरिकांचे दिवसातले पाच ते सात तास प्रवासात जातात त्यामुळे या नागरिकांची झोप पूर्ण होत नाही. परंतु, प्रवासात घेतलेली थोडीशी झोप त्यांचे आरोग्य उत्तम ठेवत असेल तर मुंबई लोकल ट्रेनचे आभार नक्कीच मानले पाहिजे.
झोप अपूर्ण झाल्यास?
झोप अपूर्ण झाल्यास त्याचा परिणाम थेट स्मरणशक्तीवर, सामान्य माणसाकरता ७-८ तास तर, लहान मुलांना १० तास झोप आवश्यक, अपूर्ण झोप बिघडलेल्या शारीरिक व मानसिक अवस्थेचे पहिले लक्षण, कौटुंबिक समस्यांमुळे १० पैकी ६ जण निद्रानाशेचे बळी.
आज मुंबईत काम करण्यासाठी असंख्य नागरिक येतात. कामावर पोहचण्यासाठी दोन ते तीन तासाचा प्रवास करावा लागतो. तसाच, घरी परतण्याचा प्रवास तेवढाच असतो त्यामुळे प्रवासात झोप घेण्याची सवय मुंबईकरांना लागली आहे व यात काही वावगे नाही. कामाच्या गडबडीत जर मुंबईकर आपली थोडी फार झोप, प्रवासादरम्यान लोकल ट्रेनमध्ये घेत असतील, तर ही दिलासादायक बाब आहे. डॉ. बिन्ही देसाई, ईएनटी आणि व्हॉईस सर्जन-लॅरिन्गोलॉजिस्ट.