---Advertisement---
धरणगाव : राज्य शासनाने येत्या चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात, असा आदेश न्यायालयाने दिल्याने त्या अनुषंगानेच तालुक्यातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागते आहेत. यंदा नगरपालिकेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या राजकीय पक्षांकडून निवडणुकीची पूर्वतयारी केली जात असून गतिमान हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने महायुतीचे पदाधिकारी जोरात आहेत, तर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही विधानसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी स्थानिक पातळीवर विजय संपादन करण्याचा दृष्टीने कंबर कसली आहे.
नगरपालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा केव्हा होते, याकडे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते, परंतु न्यायालयानेच शासनाला आदेश दिल्याने निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांनी तयारीस प्रारंभ केला आहे निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आतापासूनच मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. विवाह सोहळ्यांसह इतर विविध सार्वजनिक कार्यक्रम तसेच अंत्ययात्रांना इच्छुकांची उपस्थिती आवर्जून दिसून येत आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील उमेदवार ठरविण्याबाबत नियोजन सुरू केले आहे. महायुतीतर्फे पालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महायुतीचे उमेदवार ना. गुलाबराव पाटील ६० हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. त्यांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्याकडून या निवडणुकीची पूर्वतयारी केली जात आहे.
---Advertisement---
गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे अनेकांची कामे होत नसल्याने निवडणुकीकडे राजकीय पक्षांकडून हालचालीस गती प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगानेच व्यूहरचना आखण्यात येत आहे. सध्या महायुती व महाविकास आघाडीत सरळ लढतीचे चित्र दिसून येत आहे.
अनुकूल वातावरण
शहरासह ग्रामीण भागात भाजप आणि शिवसेनेचे संघटन मजबूत असल्याने तसेच विधानसभा निवडणुकीत ना. गुलाबराव पाटील यांना बहुतांश गावांमध्ये चांगले मताधिक्य मिळाल्याने त्यांना अनुकूल वातावरण असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीचे नगण्य संघटन असल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. त्यातच महाविकास आघाडीतील बडे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर व सतीश पाटील हे महायुतीच्या घटक पक्षात सामील झाल्याने जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढली आहे. म्हणून आगामी काळात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उबाठा पक्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अस्तित्वाचा प्रश्न ठरणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आता पालिका, महापालिका तसेच जि. प. व पं.स.च्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने उमेदवाराचा शोध आणि बोध घेण्यात उत्सुक दिसत आहेत.