मनपाने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशांनाही फासला हरताळ : तयार झालेले रस्ते खोदण्याची जणू शर्यतच!

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव,२३ एप्रिल : शहरातील रस्ते कामांना कसाबसा मुहूर्त लाभला पण तयार झालेले रस्ते खोदण्याची जणू शर्यत सुरू असल्याचे दृश्य शहरात पहायला मिळते आहे. रस्ते खोदण्यापूर्वी परवानगी घ्या, असे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश असताना या आदेशांना हरताळ फासत मनपाकडून चक्क जिल्हाधिकार्‍यांच्या बंगल्या समोर झालेल्या रस्त्यावर कोदकाम करून जणू त्यांना आव्हानच देण्यात आले आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून अमृत योजनेचे काम शहरातील विविध भागात सुरू असल्यामुळे रस्त्यांची कामे थांबली होती. अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यांमध्ये चार्‍या खोदल्या गेल्यानंतर खराब असलेल्या रस्त्यांची दैना झाली. दोन वर्षात तर अतिशय दयनिय अशी अवस्था विविध भागातील रस्त्यांची झाली. परिणामी नागरिकांना मणक्यांचे आजार जडले.

अखेर कामांना लाभला मुहूर्त

रस्त्यांच्या परिस्थितीवरून मनपा प्रशासन तसेच सत्ताधार्‍यांविरूद्ध कमालीचा असंतोष शहरात होता. अखेर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधी मिळविला. शहरातील रस्ते कामांसाठी जवळपास २०० कोटींचा निधी त्यांनी मंजूर करून घेत काही निधी प्राप्तही झाला. परिणामी शहरातील रस्ते कामांना सुरूवात झाली आहे.

पूर्ण झालेल्या रस्त्यांवर खोदकाम

शहरातील रस्त्यांच्या कामांना मुहूर्त लाभला मात्र तयार झालेल्या रस्त्यांवरून येण्या-जाण्याचा आनंद मिळण्यापूर्वीच नागरिकांना तयार रस्त्यांवर खोदकाम केले जात असल्याचे दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या रस्त्यांवर मनपाकडून पाईप लाईनच्या नावाने पुन्हा खोदकाम केले जात आहे. परिणामी रस्ते कामाचा मक्ता घेतलेल्या श्रीश्री इन्फ्रा.कडून सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र दिले. खोदकाम केलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीची जबाबदारी आम्ही घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. याप्रश्‍नी जिल्हाधिकार्‍यांनी आदेश देऊनही मनपा पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी चांगल्या रस्त्यांचे स्वप्न पूर्ण होणे अवघड झाल्याची स्थिती दिसत आहे.

जिल्हाधिकारी बंगल्यासमोर खोदकाम

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या घरासमोरील रस्त्याचे नुकतेच काम झाले. याच रस्त्यावर आता मनपा पाणी पुरवठा विभागाकडून खोदकाम करण्यात आल्याने मनपा यंत्रणा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशांनाही हरताळ फासत असल्याची परिस्थिती शहरात आहे.