काय हिम्मत… डिग्री व शिक्षणाविनाच थाटला दवाखाना, मुन्नाभाई डॉक्टरला बेड्या

भुसावळ : कुठलीही वैद्यकीय पदवी तसेच शिक्षण नसताना विनापरवानगी आयुर्वेदिक दवाखाना टाकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणार्‍या तोतया मुन्नाभाई डॉक्टरला नाशिक आयजींच्या विशेष पथकाने छापा टाकून बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील बसस्थानकाजवळील सुरभी कॉम्प्लेक्समध्ये मंगळवार, 7 रोजी रात्री उशिरा झालेल्या कारवाईने बोगस डॉक्टरांच्या तंबूत घबराट पसरली आहे तर बोगस डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शमशेर शेख कादीर शेख (41, प्लॅट क्रमांक 111, पहिला मजला, झैबुनिसा अपार्टमेंट, दर्गा मशीदरोड, कौसा, मुंब्रा, ठाणे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील या मुन्नाभाई डॉक्टराविरोधात मुंबईत अशाच पद्धत्तीचा एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

 

सापळा रचून केली अटक

शहरातील शिवाजी नगराजवळील सुरभी कॉम्प्लेक्समध्ये तोतया डॉक्टरांकरवी आयुवेर्दिक उपचार होत असल्याची गोपनीय माहिती नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. पथकातील वरिष्ठ निरीक्षक बी.जी.रोहोम व सहकार्‍यांनी आरोग्य विभागातील पथकाला सोबत घेत मंगळवारी सायंकाळी संशयित समशेर शेख याच्या सागर आयुर्वेदिक दवाखान्यात पोलीस कर्मचार्‍याला आजाराचा बहाणा करून पाठवल्यानंतर संशयिताने नाडी परीक्षण करीत तुम्हाला शारीरीक कमजोरी आल्याने त्यावर उपचार करावे लागतील व त्यासाठी 12 हजार रुपये खर्च येईल, असे सांगून विश्वास संपादन केला व सुरूवातीला त्यासाठी काही गोळ्या देतो, असे सांगून गोळ्या दिल्या व रुग्ण बनून आलेल्या कर्मचार्‍याने 500 रुपये दिल्यानंतर पथकाला सिग्नल देताच संशयिताच्या मुसक्या बांधण्यात आल्या.

दवाखान्यात लावली बर्‍हाणपूरच्या डॉक्टरांची डिग्री

संशयित आरोपीने बर्‍हाणपूर येथील बीयुएमएस डॉ.शेख अमजद शेख अहमद यांच्या नावाची डिग्री लावल्याचे दिसून आले असून त्यासाठी संशयित त्यांना दरमहा तीन हजार रुपये देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.