नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मतदान आज होत आहे. मतदान सुरळीत पार पडावं यासाठी तब्बल १ लाख ३५ हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, आज मतदानादिवशीची मोठ्या प्रमाणावर हिंसेचा आगडोंब उसळला असून, त्यात काही कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. तर काही ठिकाणी मतपत्रिका पळवण्याचे प्रकार घडले. तर काही ठिकाणी मतपेट्या जाळण्यात आल्या.
पश्चिम बंगालनिवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार २२ जिल्ह्यातील ६३ हजार २२९ ग्रामपंचायतीच्या जागा, पंचायत समितीच्या ९ हजार ७३० जागा आणि जिल्हा परिषदेच्या ९२८ जागांवर हे मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल ११ जुलै रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, ८ जून रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला असून, यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज होत असलेल्या मतदानादरम्यान, २४ परगणा जिल्ह्यात रस्त्याच्या शेजारी टीएमसीचा बॅनर घेऊन बसलेल्या कार्यकर्त्याची पोलिसांना मारहाण केली. तर पश्चिम बंगालमधील सीताई येथे एका मतदान केंद्रावर मोडतोड करण्यात आलीय तिथे मतपत्रिका पळवून त्या पेटवून देण्यात आल्या. कूचबिहारमधील फोलिमारी येथे शनिवारी सकाळी हल्लेखोरांनी भाजपाचे पोलिंग एजंट माधव विश्वास याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका ठिकाणी बॉम्बफेक करण्यात आली.