जामनेर : तालुक्यातील चिंचखेडा येथील 35 वर्षीय विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी 1.30 वाजता घडली. या घटनेने तालुक्यातील मोठी खळबळ उडाली आहे. सरलाबाई सुरेश पाटील (35) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित विशाल नाना साबळे (23, चिंचखेडे बुद्रूक) यास अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपीस बुधवारी न्यायालयात हजर केले असता 13 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
अवघ्या तीन तासात आरोपी जाळ्यात
जामनेर शहरापासून अवघ्या आठ कि.मी. अंतरावर असलेल्या जळगाव रोडवरील चिंचखेडा येथे येथे सरलाबाई पाटील या सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरात एकट्या असताना वाईट हेतूने आरोपी विशाल साबळे याचा हेतू साध्य न झाल्याने आरोपीने लोखंडी अवजार डोक्यात मारून विवाहितेची हत्या करीत पळ काढला. मयत विवाहितेचे चुलत सासरे सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना सून रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच त्यांनी ग्रामस्थांसह पोलिसांना माहिती कळवली.
पोलीस अधिकार्यांची धाव
जिल्हा पोलीस अधीक्षक एम.कुमार, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पाचोरा विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किसान नयन पाटील, जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे तसेच फॉरेन्सिक व डॉग स्कॉडने धाव घेतली. जामनेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या तीन तासात आरोपी विशाल साबळे यास अटक केली. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधवारी त्यास न्यायालयाने 13 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप राठोड करीत आहेत.