चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यातून एक थरारक घटना समोर आलीय. चुलत दिरासोबत असलेल्या प्रेम संबंधात अडथळा निर्माण होईल म्हणून पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा ब्लेडच्या सहाय्याने पोटावर वार करून तसेच दगड डोक्यात टाकून खून केला. विशेष म्हणजे पतीच्या अपघाती मृत्यूचा बनाव तिने केला. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या खुनाचा उलगडा केला. याप्रकरणी महिला व तिच्या चुलत दिराला अटक करण्यात आली.
बाळू सीताराम पवार (३५, रा.गवळीवाडा, न्यायडोगंरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे या मृत इसमाचे नाव आहे. तो पत्नी वंदना पवार (३०) हिच्यासह न्यायडोंगरी येथे राहत होता. तिचे व चुलत दीर गजानन राजेंद्र पवार (३२, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) याच्याशी मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
वंदना व बाळू हे मंगळवार १८ रोजी न्यायडोंगरी येथून चाळीसगाव येथे आले. बाळू यास गजानन याने दारू पाजली. सायंकाळी गजानन यास दुचाकीने कोदगाव ता. चाळीसगाव शिवारात नेले. तिथे वंदनाने बाळूच्या पोटावर ब्लेडने वार केले आणि दोन वेळा डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार मारले आणि मृतदेह महामार्गावर टाकून दिला. बाळूच्या खिशात आधारकार्ड ठेवले. यानंतर दोघे तेथून पसार झाले.
दरम्यान, तुषार अनिल देसले (रा. कोदगाव, ता. चाळीसगाव) यांनी १८ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिसात अपघाताची माहिती दिली. त्यावरून चाळीसगाव शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी आधारकार्डावरुन माहिती घेत वंदना व गजानन यास बुधवारी सायंकाळी अटक केली.