नंदुरबार : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत पतीने तिच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून तिला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील मोरखी येथे ही घटना घडली. लक्ष्मी मानसिंग वसावे (२८) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती मानसिंग खोजल्या वसावे (३५) आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध अक्कलकुवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जयसिंग वसावा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मानसिंग हा नेहमीच पत्नी लक्ष्मी यांच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता. त्या कारणातून मारहाण करणे, शिवीगाळ करणे, तसेच मारून टाकण्याची धमकी देत होता. १५ ते १७ जानेवारीच्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड
लक्ष्मी यांचा मृतदेह गावालगतच्या नदीपात्रात आढळून आला. डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून ठार मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत मानसिंग वसावे व आणखी एक जण अशा दोन जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरिक्षक गुलाबराव पाटील करीत आहे. दरम्यान, या घटनेमुळे अक्कलकुवा तालुका व परिसरात खळबळ उडाली आहे.