नागपूर : लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात वाहू लागले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कमालीचे सक्रिय झाले आहेत. अयोध्येत श्रीराम मंदीराच्या उद्घाटनामुळे देशात भगवेमय वातावरण दिसून येत आहे. त्यातच आता नागपूरमध्ये काही अल्पसंख्यांक समुदयातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मोदींना यश मिळावं यासाठी प्रसिद्ध ताजुद्दीन बाबा दर्ग्यात चादर चढवली आणि प्रार्थना केल्याचे समोर आले आहे.
सकाळच्या प्रतिनिधींच्या माहितीनुसार, यावेळी मुस्लिम आणि शीख समाजच्या बांधवांनी ताजुद्दीनबाबा दर्गा परिसरात हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह यांच्या मजारावर मोदींच्या विजयासाठी चादर चढवण्यात आली. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यश मिळावं, यासाठी नागपुरात ताजुद्दीनबाबा दर्ग्यात विशेष प्रार्थना करण्यात आली.
यावेळी राज्यसभेचे खासदार आणि इंडियन मायनॉरिटी फाऊंडेशनचे (आयएमएफडी) संयोजक सतनामसिंग संधू उपस्थित होते. यावेळी हजरत ताजुद्दीनबाबा मल्टीस्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलचं उदघाटनही पार पडलं.