बंगळुरू : टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून कर्नाटकात पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. म्हैसूर विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या काँग्रेस आमदार प्रसाद अब्बय्या यांच्या मागणीवरून नवा वाद सुरू झाला आहे. विमानतळाचे नामकरण टिपू सुलतान करण्याच्या प्रस्ताव ठेवल्यानंतर भाजपा आमदारांनी सभागृहात जोरदार विरोध केला. यानंतरही कर्नाटक विधानसभेने केंद्र सरकारला प्रसिद्ध व्यक्तींच्या नावावर चार विमानतळांचे नाव देण्याचे आवाहन करणारा ठराव एकमताने मंजूर केला आहे.
2016 मध्ये सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना त्यांनी 10 नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान यांचा वाढदिवस ‘टिपू जयंती’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती. मात्र, 2019 मध्ये भाजपाची सत्ता आल्यावर हा उत्सव बंद झाला. दरम्यान, या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कर्नाटकात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आणि सिद्धरामय्या पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा टिपू सुलतानचे नाव देण्याचा मुद्दा उकरुन काढला आहे.
कर्नाटक विधानसभेने केंद्र सरकारला प्रसिद्ध व्यक्तींच्या नावावर चार विमानतळांचे नाव देण्याचे आवाहन करणारा ठराव एकमताने मंजूर केला आहे. यामध्ये हुबळी विमानतळाला क्रांतिवीर सांगोली रायण्णा, बेलागावी विमानतळाचे नाव कित्तूर राणी चेन्नम्मा, शिवमोग्गा विमानतळाचे नाव राष्ट्रकवी डॉ. के.व्ही. पुट्टप्पा (कुवेंपू) आणि विजयपुरा विमानतळाला जगद्ज्योती बसवेश्वरांचे नाव देण्यात येणार आहे.
सिद्धरामय्या मंत्रिमंडळातील मंत्री एम बी पाटील यांनी स्पष्ट केले की, विमानतळांसाठी प्रस्तावित नवीन नावे केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर केली जातील. मात्र, केंद्र सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावात म्हैसूर विमानतळाचे ‘टिपू सुलतान विमानतळ’मध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही.