रहस्यकथाकार नारायण धारप यांना मिळाला समर्थ वारसदार

जळगाव | 9 मार्च 2023 | नारायण धारप, द.पा.खांबेटे, बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक ही नावे कदाचित अलिकडच्या नव्या पिढीला माहित नसावीत पण त्यांचे वाडवडील म्हणजे मागच्या तीन-चार पिढ्या या लेखकांच्या रहस्यकथा, गुढकथा, कादंबर्‍या वाचुनच मोठ्या झाल्या आहेत. अफाट वाचकप्रियता या लेखकांना मिळाली होती. थोडसं अलीकडच्या काळातील श्रीकांत सिनकर, रत्नाकर मतकरी, सुहास शिरवळकर यांनाही रहस्यकथा, गुढकथा आवडणार्‍या वाचकांनी डोक्यावर घेतले. मात्र नव्या पिढीत अश्या प्रकारच्या वाचकांना खिळवून ठेवणार्‍या लेखकांची खुप कमतरता भासते.

धनंजय, रहस्यकथा, गुढकथा या नावांचे दिवाळी अंक त्याकाळात स्टॉलवर आले रे आले की, हातोहात खपत असत. परंतू प्रसारमाध्यमे वाढली. मुद्रीत माध्यमांची त्यातल्या त्यात मासिके आणि दिवाळीअंक यांची वाचकसंख्या झपाट्याने घसरली. या संघर्षाच्या काळात धनंजय नावाचा दिवाळी अंक वाचक प्रेमाचा झेंडा अखंड फडकवत आहे. आजही धनंजय दिवाळी अंकाला मोठी मागणी असते. नेमके कारण सांगता येत नाही पण, या वेगळ्या लेखन क्षेत्राकडे मोजके लेखक सोडले तर, नव्यापिढीतले लेखक फारसे वळलेले दिसत नाहीत. या मोजक्या लेखकांपैकी एक अग्रणी नाव म्हणजे अ‍ॅड.सुशील अत्रे. वर्षभरात फक्त धनंजय दिवाळी अंकातच अ‍ॅड. अत्रे यांची हजेरी लागलेली असते.

धनंजय दिवाळी अंक आणि अ‍ॅड.अत्रे यांची खिळवून टाकणारी कथा हे एक समिकरण झालेले आहे. 2012 साली त्यांनी पहिली रहस्यकथा लिहीली. नाट्यकर्मी आणि नाट्यलेखक असणार्‍या अत्रे यांनी वेगळेच लेखन क्षेत्र निवडून काम सुरु केले. जयदिप आणि मेघना ही त्यांची दोन प्रमुख पात्रं. पहिली कथा अत्रे यांनी जेव्हा धनंजयकडे पाठविली त्यावेळी धनंजयचे मालक संपादक राजेंद्र कुलकर्णी यांनी त्यांना स्विकृतीचे पत्र पाठवून कथा फारच आवडल्याचे कळविले. वाचकांनाही ही कथा आवडल्याच्या प्रतिक्रीया मिळाल्या. त्यानंतर सलग 10 वर्ष जयदीप आणि मेघना ही पात्रं दिवाळी अंक वाचकांच्या मनात घर करुन राहीली. नारायण धारप, गुरुनाथ नाईक यांच्या पात्रांप्रमाणेच जयदीप आणि मेघना ही जोडी वाचकप्रिय ठरली. अत्रे यांनी या कथा लिहितांना कोणत्याच लेखकाने न हाताळलेला वेगळाच पॅर्टन निवडला होता. त्यांच्या रहस्यकथांचे बीज या पृथ्वीतलावर सध्याच्या काळात कधी तरी कोठेतरी घडलेल्या गुढ अर्तक्य घटनेत असते.

या कथाबिजाची आणि भारताच्या प्राचीन पौराणिक समजांना दूर न करता त्यामागे काय दडलंय याची थोडीशी विज्ञानवादी दृष्टीकोनातून सांगड घालत कथा उभी राहते. यावेगळ्या लेखन प्रकाराला धनंजयचे संपादक राजेंद्र कुलकर्णी यांनी ‘अदृष्टकथा ‘असे म्हटले आहे. उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी दाभोळ समुद्रात 8 हजार वर्षांपूर्वीची जास्त रुंदीची आणि लांब लचक भिंत संशोधकांना सापडली. या संशोधनाच्या पुराव्यासह बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. हे कथाबीज घेऊन त्यावर अत्रे यांनी एक कथा लिहिली अर्थात जयदीप आणि मेघना या पात्रांना घेवूनच आणि दरवर्षीच्या कथेमध्ये एक महत्वाचे पात्रं असते . हे पात्रं म्हणजे आपल्या पुराण काळातील अजरामर मानले गेलेले ‘चिरंजीव’ हनुमान, बिभिषण परशुराम, अश्वत्थामा महर्षी व्यास .सध्याच्या काळातील मेघना जयदिप आणि पुराणकाळातील चिरंजीव असणारे पात्र वाचकांची उत्कंठा वाढवतात.

दहा वर्षांनंतर म्हणजे 2021 च्या दिवाळी अंकानंतर मेघना आणि जयदीप या वाचकप्रिय जोडीने वाचकांचा निरोप घेतला. नारायण धारप हे अ‍ॅड. अत्रे यांचे अतिशय आवडीचे लेखक. त्यांच्या कथांची कादंबर्‍यांची पारायणे केलेली. 2022च्या धनंजय दिवाळी अंकात अत्रे यांनी धारप यांच्या अजरामर, समर्थ कथांचे पुनरुर्जीवन केले. धारप यांचीच पात्रं अगदी शैलीही तशीच .नारायण धारप यांच्या कुटूंबियांनी धारप यांचा वारसा कायम ठेवण्यासाठी उत्साहाने अत्रे यांना धारप यांची लोकप्रिय पात्रांची नावे वापरण्यास परवानगी दिली आहे. मागील वर्षी म्हणजे 2022 च्या धनंजयच्या दिवाळी अंकात धारप शैलीची अत्रे यांची समर्थ कथा प्रसिध्द झाल्यानंतर वाचकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. आणि वाचकांमधून स्वागत झाले. धारप यांच्या ‘फॅन’ना समर्थकथा वाचून पुन्हा एकदा ‘धारप’ वाचल्याचे समाधान मिळाले. ‘आयुष्यावर बोलू काही’ या गाजलेल्या गीत संग्रहाचे गीतकार आणि गायक संदीप खरे यांनी आवर्जून फोन केला. पुन्हा एकदा तुमच्या लेखणीच्या रुपाने धारप भेटले. अशी दाद त्यांनी दिली. एका मोठ्या कलाकाराने दिलेली ही दाद म्हणजे अत्रे यांची समर्थ कथा धारपांचा वारसा समर्थपणे सुरु ठेवेल याची खात्री देणारी आहे.

-विभाकर कुरंभट्टी