निसर्गकवी, ज्येष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर यांचं आज सकाळी साडेआठ वाजता निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तसंच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने साहित्यकलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ना. धो. महानोर यांचं लिखाण हे निसर्गाशी नातं जोडणारं होतं. त्यांच्या कवितेतून निसर्ग बोलायचा इतकं सुंदर त्यांच्या गीतांचे बोल होते. ‘मी रात टाकली..मी कात टाकली’ ही त्यांच्या लोकप्रिय गीतांपैकीच एक रचना आहे. त्यांचा’रानातल्या कविता’ हा कवितासंग्रह खूप गाजला होता. स्वत: शेतकरी असल्याने निसर्ग, शेतीविषयी असलेलं प्रेम त्यांच्या कवितेतून झळकायचं. महानोरांच्या पार्थिवावर उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्व. ना. धो. महानोर यांची पहिली कविता
स्व. ना. धो. महानोर यांची १९६० साली प्रकाशित झालेली ही पहिली कविता जळगाव मूळजी जेठा महाविद्यालयाच्या १९६० च्या वार्षिक अंकात प्रसिद्ध झाली होती.
कविवर्य ना.धों. महानोर दादा त्यांच्या कवितांनी मराठी वाचकांच्या व रसिकांच्या मनात नेहमीच राहतील. निसर्ग, शेती-माती-माणसं हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. निसर्गाची बोली जाणनारे ते हिरव्या बोलीचे जादूगार होते. आमच्या मू.जे.महाविद्यालयातील मराठी विभागात प्री.डिग्री चे शिक्षण घेत असतांना 1960 च्या अजिंठा या नियतकालिकात त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली होती, ही आमच्या विभागासाठी व महाविद्यालयासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. आदरणीय महानोर दादांना भावपूर्ण आदरांजली..!
– शोकाकुल मराठी विभाग, मू.जे.महाविद्यालय जळगाव.