Nagpur Solar Company Explosion: लग्न झालेल्या कुठल्याही मुलीसाठी माहेरी येण्याचा आनंद शब्दांत न मावणारा असतो. माहेर घराजवळ असो वा लांब, तिथे वारंवार जाणे असो वा क्वचित… माहेरी जाऊन दोन क्षण सुखात घालविण्याची प्रत्येकीची इच्छा असते. रुमिता विलास उईके हीदेखील ‘बाबा, मी रविवारी येते भेटायला’, असे म्हणाली होती. मात्र, ‘सुटीच्या दिवशी सकाळची शिफ्ट करून ओव्हरटाइमचे अधिकचे पैसे मिळाल्यास बरे होईल’, असा विचार करून ती कामावर गेली आणि तिचे माहेरी येणे कायमचेच राहून गेले.
सोलर कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात मृत्यूच्या दाढेत ओढल्या गेलेल्या नऊ जिवांपैकी एक रुमिता विलास उईके या ३२ वर्षीय संसारी महिलेचा होता. कमी वयात लग्न झाले. पती विलास हे शेतमजुरी करतात. शेतमजुरीतून येणाऱ्या अल्पउत्पन्नात घराचा गाडा चालविणे शक्य नव्हते. त्यामुळे रुमिता हिने कंपनीत काम करण्याचा निर्धार केला. इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या रुमिताने तीन-चार वर्षांपूर्वी कामास सुरुवात केली. दोघांच्या कमाईत घर सुरू होते.
अल्पशिक्षित असूनही खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरणाचा परिपाठ तिने गावातील इतर मुलींपुढे घालून दिला होता. ती तिच्या कुटुंबासह कारंजा तालुक्यातील धागा या गावी राहायची तर वडील धामणगाव येथे असायचे. अधूनमधून ती माहेरी यायची. तर कधीकधी मुलीची ख्यालीखुशी विचारायला वडील देवीदास इरपाती हे तिच्याकडे जाऊन यायचे. शुक्रवारीच ते तिच्या घरी जाऊन आले होते. तिने चहा, चिवडा खायला दिला होता. त्यावेळी ‘बाबा मी रविवारी घरी येईल’, असे ती म्हणाली होती. त्यानुसार, रविवारी तिच्या येण्याची आम्ही प्रतीक्षा करत होतो. पण, सकाळी-सकाळी कंपनीत स्फोट झाला असून त्यात मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी कळली आणि दु:खाचा डोंगर कोसळला, अशी भावना तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
रुमिता उईके हिला दोन मुले आहेत. यातील थोरला मुलगा आर्यन इयत्ता सातवीत तर धाकटा मुलगा ऋत्विक इयत्ता चौथीत आहे. दोन्ही मुलांवर तिचा जीव होता. ती उत्तम स्वयंपाक बनवायची. तिच्या जाण्याने सुखाचा संसार कोलमडला असून मुलांना आईबद्दल काय सांगायचे, कसे सांगायचे, असा प्रश्न सतावत असल्याचे तिचे वडील देवीदास इरपाती अश्रू पुसत म्हणाले.