मुंबई : महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार चर्चा सुरु असतांना आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा विरोधकांचा उमेदवार कोण असणार यावरून राजकीय चर्चा होताना दिसतात. अनेकांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याची चर्चा आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे नाना पटोले यांनी मुख्यमंत्रपदाबद्दल त्यांची इच्छा बोलून दाखवली आहे. आपण मुख्यमंत्री व्हाव ही कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होवो असे पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले म्हणाले की, “कार्यकर्तेच नाही तर सामान्य लोकांच्या मनात हा विचार येत असेल तर ही दैवी कृपा आहे. लोक या श्रद्धेने काम करतात. शेवटी देव कोणालातरी निमीत्त करत असतो, देवाला मला निमीत्त करून अजून काही चांगलं करून घ्यायचं असेल तर तो देवांचा अशीर्वाद असतो. मनुष्य हा कृती आणि कर्म करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे जे काही कोणाच्या मनोकामना, सोबती आणि चाहत्यांच्या इच्छा असतील ती पूर्ण होवो” असे नाना पटोले म्हणाले.
एकीकडे राष्ट्रवादीतील अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला असतानाच, दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील देखील अमित शाहांना भेटल्याची चर्चा आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, “राष्ट्रवादीत काय सुरु आहे हे आम्हाला बघण्याचं कारण नाही.” आम्हाला जनतेची काळजी असल्याचे म्हणत राष्ट्रवादीवर बोलणे पटोले यांनी टाळले. तर, बाप हा बापच असतो, एक मुलाने गडबड केली तरी फरक पडत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
दरम्यान याचवेळी पटोले यांनी राज्यातील सरकारवर देखील निशाणा साधला. “हे बधीर आणि नालायक सरकार आहे. भय आणि भ्रष्टाचाराच्या बळावर हे सरकार आहे. अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहे हे अध्यक्षांना देखील माहित नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे, लोकशाहीचा गळा घोटणे सुरु आहे. आम्ही हे सगळं जनतेपर्यंत घेऊन जाऊ, आणि जनतेला सगळं सांगू,” असे पटोले म्हणाले.