हिंदू राष्ट्रावरुन नाना पटोले यांचं भाजपला चॅलेंज

नागपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी. नाही तर त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. बावनकुळे यांनी हा इशारा दिलेला असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला डिवचले आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे काय? तुमची हिंदू राष्ट्राची संकल्पना काय आहे? ही संकल्पना स्पष्ट करा; असं आव्हानच नाना पटोले यांनी दिलं आहे.

आपण हिंदुस्थानातच राहतो. हिंदू राष्ट्राचा अर्थ भाजपने सांगावा. हिंदू राष्ट्र म्हणजे काय ते त्यांनी सांगावं. भाजप ज्यांना मानते त्यांची हिंदू राष्ट्राची संकल्पना काय होती? ते त्यांनी स्पष्ट करावी. या देशात बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम राहतात. ते या देशात राहणार नाहीत अशी त्यांची हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे काय? असा सवाल करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभाव मांडला. भाजपने हिंदुत्व सांगून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सातत्याने केले आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

राहुल गांधी मातोश्रीवर जाणार आहेत काय? या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधी यांचा मुंबई दौरा आणि भेटींचा प्रोग्रॅम अजून आलेला नसल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जाणीवपूर्वक लक्ष भरकटण्याचे काम चालू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.