तभा वृत्तसेवा
रावेर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील खिरवड येथील सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
चार दिवस चाललेल्या या उपक्रमात पहिल्या दिवशी ग्राम कृषी विकास समिती व स्वयंसेवकांची बैठक घेऊन सायंकाळी मशाल फेरी व गाव बैठक आयोजित करण्यात आली. दुसऱ्या दिवशी प्रभात फेरी, कृषी विषयक लक्ष्य गट चर्चा, श्रमदान, शिवार फेरी, माती नमुने संकलन व पाण्याच्या पातळीची पाहणी आदी उपक्रम राबवले गेले. तिसऱ्या दिवशी मृदा व जलसंधारण नकाशांचे चिन्हांकन, संसाधन नकाशा तयार करणे व महिला सभा घेऊन पाण्याच्या अंदाजपत्रकाची वाचन व चर्चा करण्यात आली. चौथ्या दिवशी ग्राम कृषी विकास समितीबरोबर हवामान अनुकूलन आराखड्याचे सादरीकरण करून व त्यात सुधारणा सुचवून ग्रामसभेच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी हर्षदा देसले व तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी केले. या मोहिमेंतर्गत मंडळ कृषी अधिकारी मयूर भामरे, कृषी पर्यवेक्षक किशोर पाटील व कृषी सहाय्यक अक्षय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांच्या सहभागाने विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
यांनी घेतला सहभाग
या मोहिमेमध्ये ग्रामपंचायत सरपंच पुनम कोळी, जिप शाळा मुख्याध्यापक दीपक चौधरी, भाजपा जिल्हा चिटणीस राजन लासुरकर,राष्ट्रवादी माजी तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी,भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्षा आशाताई सपकाळे,प्रगतिशील शेतकरी सुधाकर लासुरकर,ग्रामसेवक हंसराज सिरसाड,गोपाळ कोळी,लाडकाबई चौधरी,गजानन चौधरी,ग्रामपंचायत सदस्य, चंद्रभान सन्यासी,जितेंद्र चौधरी,निलेश लासुरकर,पद्माकर चौधरी,बंडू चौधरी,ग्राम कृषी विकास समिती सर्व सदस्य, स्वयंसेवक, तसेच खिरवड गावातील शेतकरी व अधिकारी वर्ग यांनी सक्रिय सहभाग घेतला.