Nandurbar: जलजीवनाची कामे न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा

Nandurbar :    जिल्ह्यात जलजीवन योजनेला सुरुवात होऊन एक वर्षाहून अधिकचा कालावधी उलटला आहे. एप्रिल, मे महिन्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप कामांना सुरुवात करण्यात आलेली नसून अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. यामुळे जलजीवनची कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी.  टेंडर रद्द करुन तात्काळ नवीन निविदा प्रक्रिया राबवून जलजीवनच्या कामांना गती देण्यात यावी, अशी मागणी जि.प.सदस्य भरत गावित यांनी केली. जिल्ह्यात जलजीवनची कामे सुरू असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिली. तसेच  लसीकरणानंतर मृत बालकाचा अहवाल तीन महिने उलटूनही प्राप्त न झाल्याने जिल्हा परिषदेचा  सदस्यांनी सर्वसाधारण सभेत नाराजी व्यक्त केली.

 

नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपाध्यक्ष सुहास नाईक, महिला व बालकल्याण सभापती संगिता गावित, कृषी सभापती हेमलता शितोळे, शिक्षण सभापती गणेश पराडके, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार व्यासपीठावर उपस्थित होते. सभेत जलजीवन योजनेच्या कामांची संथ गती, आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नांवर सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

 

सदस्य प्रताप वसावे यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला कॉल केल्यावर ती तळोद्याहून अक्कलकुवा येते. तालुक्यासाठी स्वतंत्र १०८ सुविधा देण्याची मागणी केली. जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना गणितातील मुलभूत क्रिया येत नाहीत, साधे पाढे येत नसल्याचे तक्रार  जि.प.सदस्या अर्चना गावित व राजश्री गावित यांनी केली. विविध विभागांना दिल्या जाणाऱ्या पत्रांबाबत अधिकाऱ्यांकडून तात्काळ उत्तरे मिळत नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

नवापूर तालुक्यातील गताडी येथील येथील आरोग्य केंद्रात लसीकरणानंतर काही तासातच एका ५ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याने पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या घटनेला तीन महिने उलटूनही अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून अहवाल कधी प्राप्त होईल? असा प्रश्न सदस्य सुनील गावित, भरत गावित यांनी उपस्थित केला.

यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्या दिवशी ७ बालकांना लसीकरण झाले.बाकी सहा बालकांची प्रकृती उत्तम आहे. मयत बालकाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त असून त्यात त्याचा फुफ्फुसात संसर्गाने मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित व उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी याबाबत आरोग्य विभागाने पालकांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश दिले.

 

यावर जि.प.अध्यक्षा सुप्रिया गावित व मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी सात दिवसांच्या आत संबंधित सदस्यांना माहिती देण्यात यावी, असे निर्देश दिले. सारंगखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एएनएमची दोन पदे असताना एकही एएनएम नसल्याने महिला रुग्णांना समस्या निर्माण होत असल्याची नाराजी व्यक्त केली. यावेळी याठिकाणी एक एएनएमची नेमणूक करावी, अशा अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी आरोग्य विभागाला दिल्या. सभेत कोळदे येथे सांस्कृतिक भवनाचे बांधकाम, जि.प.नंदुरबार येथे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निवासस्थान यासह विविध १४ विषयांवर चर्चा करण्यात आली.