Nandurbar : या कारणामुळे नंदुरबारमध्ये डुक्करांची कत्तल करण्याचे आदेश

Nandurbar :  जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार तालुक्यात काही ठिकाणी आफ्रिकन स्वाइन फिवरच्या  संसर्गामुळे वराहांचे (डुकरांचे) ठिकठिकाणी मृत्यू होत  आहेत .  तातडीचा उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या शीघ्र कृती दलातर्फे गुरुवार पासून वराहांचे कलिंग सुरू करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी १४ व शुक्रवारी ११ वराहांचे असे २५ वराहांचे किलिंग करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

नंदुरबार शहरात गेल्या तीन आठवड्यांपासून दररोज चार-पाच वराहांचा साथीच्या आजाराने मृत्यू होत आहे. शहरात दररोज चार-पाच वराहांचा मृत्यू होत असून यास नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी दुजोरा दिला. शहरात मृत्यू झालेल्या वराहांची दुधाळे शिवारात असलेल्या कचरा डेपोनजीक खड्डा करून शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. आतापर्यंत दीडशे वराह मृत्यू पावल्याचे सांगण्यात येते.

 

पशुसंवर्धन विभागाने १० तारखेला मृत वराहांचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तर शहादा तालुक्यातील म्हसावद येथील मृत वराहांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात या वराहांना आफ्रिकन स्वाइन फिवरची लागण झाल्याचे आढळले आहे.

 

निवासी उपजिल्हाधिकारी गोगटे यांनी याविषयी स्पष्ट केले आहे की वराहांमध्ये संसर्ग आढळला असला तरी इतर पशुपालकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही कारण इतर प्राण्यांना तसेच मानवाला हा संसर्ग होत नसल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. बाधित क्षेत्रात किलिंग केलेल्या वराहाची वजनानुसार भरपाई मालकांना देण्यात येणार आहे, असे नंदुरबारचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यु. डी. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.