Nandurbar: वरती आग ओकणारा सूर्य, त्यात न सोसविणाऱ्या प्रसूत कळा… रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती

नंदुरबार : जिल्ह्यात पुन्हा आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजलेचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. खराब रस्त्यामुळे आणि रुग्णवाहिकेचे चाक पंक्चर झाल्याने महिलेची रस्त्यातच प्रसुती झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

सातपुड्याच्या दुर्गम भागातील महिलेला बाळंतपणासाठी बिलगाव (ता.धडगाव) प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. त्यानंतर गरोदर महिलेला बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रसुतीसाठी नंदूरबार जिल्हा रुग्णालयात पाठवायचे होते. यावेळी जिल्हा रुग्णालयात आणणारी रुग्णवाहिका रस्त्यातच पंक्चर झाल्याने या महिलेची प्रसुती रस्त्यावरच करण्याची वेळ आली. रुग्णवाहिका पंक्चर झाल्यानंतर चालकाने मदतीसाठी प्रयत्न देखील केले. मात्र मदत न मिळाल्याने अखेर महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली आहे. महिलेने यावेळी मुलाला जन्म दिला असून बाळ आणि आई दोन्ही सुखरुप आहेत.

यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातून आलेल्या रुग्णावाहिकेतून संबंधित महिलेवर डॉक्टरांनी उपचार करत तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, वारंवार नादुरुस्त होणाऱ्या 108 रुग्णवाहिका या डोकेदुखीचा विषय ठरत आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रुग्णवाहिकेत पर्यायी स्टेफनी नव्हती का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.