नंदुरबार : गाव स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी गावातील घनकचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. घनकचऱ्याचे नाडेपच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन केल्यास ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळेल. तसेच गावात दृश्यमान स्वच्छता निर्माण होऊन ग्रामस्थांचे आरोग्य ही उत्तम राहील. यामुळे ग्रामस्थांनी राज्य शासनाने सुरू केलेल्या कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू या अभियानात सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांनी केले.
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत दि. 1मे 2025 पासून राज्यात कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ श्रीरामपूर ता. जि. नंदुरबार येथे राज्याचे कृषिमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री एड. माणिकराव कोकाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ना. कोकाटे बोलत होते. यावेळी कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली शेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक विवेक गुंड, नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयवंत उगले उपस्थित होते .
यावेळी ना. कोकाटे यांनी शालेय आवारात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बांधण्यात आलेल्या नाडेपमध्ये कंपोस्ट खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या ओला व सुका कचरा, माती टाकून अभियानाचा शुभारंभ करून दिला. यानंतर ते ग्रामस्थांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की, राज्यात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागा अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी दृष्यमान स्वच्छता राहावी यासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) च्या माध्यमातून सुरु आहेत. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यात निर्माण झालेल्या विविध उपागांची शाश्वतता राहावी, व झालेल्या कामातून गावांमध्ये दृष्यमान स्वच्छता राहून त्यातून ग्रामंपचायतींना उत्पन्न मिळावे यासाठी राज्यात शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने आज दिनांक. 1 मे 2025 पासून “कंपोस्ट खड्डा भरु, आपले गाव स्वच्छ ठेवू” ! हे अभियान सुरु केले आहे. या अभियनांतर्गत गावा-गावात बांधण्यात आलेल्या खत खड्ड्यात ओला व सुका कचऱ्याच्या माध्यमातून उत्कृष्ट खताची निर्मिती होईल. खत निर्मितीतून ग्रामपंचायतींला उत्पन्नही मिळेल. तसेच गावात ओला कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी कमी होवून गावेही स्वच्छ राहतील. घनकचऱ्याप्रमाणेच गावांनी सांडपाण्याचे ही योग्य व्यवस्थापन करावे व त्या सांडपाण्याच्या पुनर्वापर करुन पाणी बचत करावी. तसेच मी आज आपणास व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मा. मंत्री गुलाबराव पाटील यांचे वतीने आवाहन करतो की, गावा-गावात सांडपाणी व घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी सर्व लोकप्रतिनिधी, सरपंच गावातील पदाधिकारी, युवक व महिला यांनी या अभियानात सहभागी होवून लोकचळवळ निर्माण करून गावे स्वच्छ व सुंदर करावीत असे आवाहन ना. कोकाटे यांनी यावेळी केले. तसेच घनकचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून घनकचरा व्यवस्थापनासाठी तीन चाकी,चार चाकी वाहने उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन यावेळी ना. कोकाटे यांनी दिले.
या कार्यक्रमास सहाय्यक गटविकास अधिकारी अनिल बिऱ्हाडे जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, सरपंच यशवंत गांगुर्डे उपसरपंच निलेश गांगुर्डे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विस्तार अधिकारी सागर राजपूत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील, ग्रामपंचायत अधिकारी रूपाली देवरे तालुका समन्वयक संदीप पानपाटील, रुपेश पाटील, सिद्धार्थ पानपाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.