---Advertisement---
नंदुरबार : दारूच्या नशेत आलेल्या पतीला जाब विचारल्याने गरोदर पत्नीला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तिचा अती रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बायसी वनकर पावरा (२८) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, धडगाव तालुक्यातील बोरी गुडानचापाडा येथे रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रविवारी बायसीबाई यांचा पती वनकर सेल्या पावरा (३०) हा रात्री दारू पिऊन आल्यानंतर महिलेने त्याला जाब विचारला होता. यातून वनकर याने पत्नी बायसीबाई यांना मारहाण करण्यात सुरुवात केली होती.
यादरम्यान लाकडी काठीने त्यांच्या पाठ, पाय आणि पोटावर मारहाण करण्यात आली. यात वर्मी घाव बसल्याने रक्तस्त्राव
सुरू होता. अती रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.
ही बाब समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी बुरक्या उल्या पावरा यांनी धडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित वनकर सेल्या पावरा याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.