Nandurbar Crime News : आता घरातही मुली सुरक्षित नाहीत, पित्याचाच पोटच्या मुलीवर अत्याचार

नंदुरबार : सख्या बापाच्या अत्याचारातून गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय गर्भपातास मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रविंद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी वैद्यकीय अहवाला आधारे परवानगी दिली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मानवतेच्या दृष्टीने खंडपीठाने १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या सुटीच्या दिवशी तातडीची बैठक घेऊन शासनाच्या सर्व संबंधीत विभागांना तातडीने आदेशाच्या अंमलबजावणीच्या सूचना दिल्या.

सिकलसेल ऍनिमिया या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या पोटच्या १३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती करणारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली. कुटुंब गरीब असल्याने वरील बाब उघड झाल्यास आपली बदनामी होईल या भीतीने काही दिवस ही बाब लपवून ठेवण्यात आली.

परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर अखेर गुन्हा दाखल झाला. वैद्यकीय गर्भपाताच्या परवानगीसाठी प्रकरण खंडपीठात आल्यानंतर त्यावर १३ सप्टेंबर २०२४ रोजी सुनावणी झाली.

खंडपीठाने सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयाचा अहवाल मागविला. रुग्णालयाने १४ सप्टेंबरला२०२४ रोजी सविस्तर अहवाल सादर केला. खंडपीठाने १७ सप्टेंबर रोजी वरीलप्रमाणे आदेश दिला.

दरम्यान, बदलापूरमधील शाळेत चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने अख्ख्या महाराष्ट्रात वातावरण तापलेलं आहे. या घटनेमुळे राज्यभरात गदारोळ माजलेला असून गेल्या काही दिवसांत मुलींवरील अत्याचाराची अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. मात्र शाळाच काय आता मुली, तरूणी त्यांच्या स्वत:च्या घरातही सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहेत.