नंदुरबार : खरवड (ता. तळोदा) येथील बेपत्ता अल्पवयीन विद्यार्थिनीचा गुरुवारी जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या बारा तासात तपास चक्रे फिरवत संशयिताला अटक केली असून, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्याला एका अज्ञातस्थळी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
खरवड (ता. तळोदा) येथील सातवीत शिकणारी १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी जि.प. शाळेसमोरून मंगळवार, १० रोजी सकाळी अचानक बेपत्ता झाली होती. याबाबत कुटुंबीयांनी गाव व नातवाईकांकडे चौकशी केली. मात्र, ती मिळून आली नव्हती. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी तळोदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस शोध घेत होते.
दरम्यान, गुरुवार, १२ रोजी मोड शिवारातील सुभाष नवले यांच्या केळीच्या शेतात मजूर निंदणी करीत होते. यावेळी त्यांना या विद्यार्थिनीचा मृतदेह आपत्तीजनक अवस्थेत आढळून आला. त्यामुळे घातपाताचा व अनुचित प्रकार घडल्याचा संशय पोलिसांना आला.
पोलिस अधिक्षक श्रावण दत्त, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी रात्रभर चौकशी करत आरोपीचा शोध घेतला. दरम्यान, गुप्त माहितीवरून पोलिसांनी संशयित आरोपी मनिष सतीश नाईक (22 रा. लाखापूर) याला एका गोठ्यातून पकडले.
दरम्यान, तालुक्यातील संतप्त नागरिकांनी तळोदा पोलिस ठाण्यात मोठया प्रमाणात गर्दी केली. जमाव इतका प्रचंड संतप्त होता की, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आरोपीला फाशी द्या, अशा संतप्त घोषणा जमावाकडून देण्यात येत होत्या. घटनेचे गांभीर्य व जमावाचा रोष बघता पोलिस विभागाने आरोपीला गोपनीय स्थळी रवाना केले असल्याचे सांगितले जात आहे.
पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड, स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषण किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, पो.उपनिरीक्षक महेश निकम, धर्मेंद्र पवार, मुकेश पवार ई. पोलिस अधिकारी व एल.सी.बी कर्मचारी यांच्या संयुक्तरित्या ही कार्यवाही करण्यात आली. घटनेचा तपास अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड करीत आहे.