नंदुरबार ( वैभव करवंदकर ) – जिल्हातील पळशी कोरडी प्रकल्पातील धरणात एका अज्ञात महिलाचे निळ्या रंगाच्या प्लास्टीकच्या पिशवीत कापलेला डोकं आढळून आल्याने जिल्हा हादरला आहे. दरम्यान, विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीत दुसऱ्या खुनाच्या नोंद झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील पळशी कोरडी प्रकल्पातील धरणात शेतकरी बैल धुण्यासाठी धरणाकडे आले असता त्यांना धरणाकिनारी निळे रंगाच्या प्लास्टीकच्या पिशवीत महिलेचे धडा वेगळे कापलेलं फक्त डोके दिसून आले. याबाबत माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली आहे.
घटनास्थळी विसरवाडी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे व खांडबारा पोलीस दाखल झाले.
मृतकाचे डोके शरीरापासून वेगळे करण्यात आल्यामुळे डोक कापुन धरणात पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकले असावे. डोके पाण्यात असल्याने ते कुजलेल्या अवस्थेत मिळून आले आहे. त्यामुळे ही महिला कोण आहे ? कुठल्या गावाची ? या महिलेचे नाव काय ? खुन कोणी केला ? काय कारण असेल ते अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीसांपुढे अज्ञात मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहे.