---Advertisement---
नंदुरबार : हरवलेल्या महिला व बालकांचा शोधण्यात जिल्हा पोलिसांना मोठे यश आले आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात महिला व बालके यांच्याबाबत बेपत्ता झाल्याची नोंद आहे, मात्र, त्यांचा शोध लागतोच असे नाही. जिल्हा पोलीस दलाने आता बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे. पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेंतर्गत हरवलेल्या 98 महिला व बालकांचा शोध घेण्यात आला असून, यात 83 महिला व 15 बालकांचा समावेश आहे.
जिल्हाभरातील हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यासाठी नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या नेतृत्वात विविध पोलीस ठाणे, उपविभागीय कार्यालयांतील पथक तयार करून हरवलेल्या 98 महिला व बालकांचा शोध घेण्यात आला. यात 83 महिला व 15 बालके यांचा शोध घेण्यात पोलीस विभागास यश मिळाले आहे. विशेषतः शहादा शहर तसेच नवापुर पोलीस ठाणे यांनी चांगली कामगिरी करून महिला व बालकांचा शोध घेतला असून, या मोहिमेमध्ये पोउपनि-भाऊसाहेब लांडगे (नवापुर पो.ठाणे), असई/भगवान धात्रक (नियंत्रण कक्ष), असई/प्रदिपसिंग राजपुत (शहादा पोलीस ठाणे), पोहेकॉ योगेश लोंढे, मपोकों/वर्षा पानपाटील (म्हसावद पो. ठाणे) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
तरी यापुढे देखील महिला व बालकांचे संदर्भात विशेष पथकांद्वारे शोध मोहिम सुरु राहणार असुन जिल्हयातील नागरिकांना हरविलेल्या व्यक्तींबाबत काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा नियंत्रण कक्षाला माहिती कळवावी, असे आवाहन यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी केले आहे.