शहादा, नंदुरबार : मणिपूरमधील अमानवीय घटनेच्या निषेधार्थ बुधवार, २६ रोजी आदिवासींसह विविध संघटनांनी पुकारलेल्या नंदुरबार जिल्हा बंदला शहाद्यात उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान शहादा आगारातील एका बसच्या अज्ञात व्यक्तींकडून काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत आगारातून बस सेवा बंद ठेवण्यात आल्या. मात्र, प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल झाले.
जिल्ह्यासह शहाद्यात आज सकाळपासून शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदला सहकार्य केले. सकाळी नऊ वाजेपासून आदिवासी संघटनांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या संख्येने जमले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर या गर्दीचे रूपांतर मोर्चात झाले. सदर मोर्चा न.पा. ईमारतिला वळसा घालुन, बस स्थानकावरुन महात्मा फुले पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करुन प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. वुई वांट जस्टीस, लोकशाही जिंदाबाद, नराधमांना फाशीची शिक्षा तात्काळ झालीच पाहिजे, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मोर्चेकरांच्या वतीने प्रांताधिकारी सुभाष दळवी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
दरम्यान आज सकाळी शहादा आगारातील बस क्रमांक एम. एच. १४ बी. टी. २३०८ शहादा ते वाडी पुनर्वसन या बस वर परीवर्धा ते कलसाडी दरम्यान अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याने या बसच्या पुढच्या काचा पूर्णपणे फुटल्या आहेत. सुदैवाने बसमधील प्रवाशांना इजा झाली नाही या दगडफेकीत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बस तेथेच उभी ठेवण्यात आली होती. शहादा पोलिसांनी बसवा पंचनामा करुन बस आगारात आणली आहे. उशिरापर्यंत शहादा पोलिसात अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. बसची तोडफोड झाल्याने शहादा आगारातून सुटणाऱ्या सर्व बस फेऱ्या खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आल्या. दुपार नंतर काही बास सेवा सुरु करण्यात आल्या.
मोर्चात जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, विद्रोही साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वाहरू सोनवणे, जेलसिग पावरा, शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डाॅ. सुरेश नाईक, आर पी आय आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद कुवर, लक्ष्मीकांत वसावे, रंजना कान्हेरे, अनिल कुवर, सुरेंद्र कुवर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, दादाभाई पिपळे, गोपाल गांगुर्डे, तुषार पाडवी, नामदेव पटले यांच्यासह विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील होते. बंद दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य बाजारपेठेसह अति संवेदनशील भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.