Big News : नंदुरबारात प्रथमच १३ महिन्याच्या बालिकेवर कॉक्लीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी

नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : जन्माजात कर्णबधीर असणाऱ्या (दिव्यांग) रुग्णांसाठी वरदान ठरलेली कॉक्लीयर इंम्प्लांट ही अवघड शस्त्रक्रिया येथील भगवती कान-नाक-घसा हॉस्पिटल व एन्डोस्कोपी सेंटर येथे प्रजासत्ताक दिनी यशस्वीरित्या पार पडली. कॉक्लीयर इंम्प्लाट सर्जन व मुंबई येथील के. ई. एम. हॉस्पीटलच्या कान-नाक-घसा विभागाप्रमुख डॉ. हेतल मारफातिया (पटेल), भगवती हॉस्पिटलचे डॉ.राजेश कोळी, डॉ. तेजस्वीनी कोळी,  डॉ.अस्मिता मढवी यांनी केवळ १३ महिन्याची अश्मिरा पिंजारी हिची शस्त्रक्रिया केली.

अतिशय नाजूक समजल्या जाणाऱ्या कॉक्लीयर इम्प्लांट ह्या शस्त्रक्रियाव्दारे कानाच्या मागील हाडामध्ये एक यंत्र बसवले जाते. त्याव्दारे बाहेरील ध्वनीलहरीचे इलेक्ट्रीक ध्वनीलहरीत रुपांतर होऊन जन्मजात कर्णबधिर बालकाला ऐकू येण्यास चालना मिळते. यापूर्वी या शस्त्रक्रियेसाठी नंदुरबारच्या रुग्णाला नाशिक, मुंबई, पुणे येथे जावे लागत असे. परंतु बरेचसे पालक मोठ्या शहरापावेतो जाण्यास तयार नसत. त्यामुळे बऱ्याच बालकांना कर्णबधीरता निदान व उपचारासाठी मुकावे लागत होते. नंदुरबार जिल्हयात बऱ्याच बालकाना जन्मतात बहिरेपणा आहे. अश्या रुग्णांसाठी ही सर्जरी एक वरदानच असते.

बालकांमध्ये बहिरेपणा आहे किंवा नाही हे पालकांना लक्षात यायला खुप उशिर लागतो. बालकाला ऐकु आल्यावरच त्याची बोलण्याची क्षमता वाढण्यास सुरूवात होत असते. जितके लवकर निदान तितका लवकर उपचार, परंतु त्या उपचारासाठी आता जिल्हातील रुग्णाला व त्याच्या पालकांना परजिल्ह्यात जावे लागणार नाही.

राज्य शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (R.B.S.K) अंतर्गत योजनेतून दोनवर्षाखालील जन्मता बहिरेपणा असलेल्या रुग्णांवर ही सर्जरी केली जाते. लहान मुलांमधील अपंगत्व व इतर आजारासाठी R.B.S.K ही योजना एक पर्वणीच ठरली आहे.

डॉ. हेतल पटेल या देशांतर्गत कॉक्लीयर इंम्प्लाट ट्रेनींग प्रोग्राम राबवतात, तसेच केईएम हॉस्पिटल मुंबई येथे नित्यनियमाने देश-विदेशातील ई.एन.टी. सर्जन यांना कॉक्लीयर इंम्प्लाट शस्त्रक्रियेबाबत ट्रेनिंग दिले जाते. डॉ. राजेश कोळी हे देखील ह्या ट्रेनींग प्रोग्राममध्ये सहभागी होत असतात.
अत्याधुनिक साधन सामुग्री आवश्यकता असलेल्या ह्या शस्त्रक्रियेला भगवती हॉस्पिटल येथे डॉ. राजेश कोळी व डॉ. तेजस्विनी कोळी ह्यांनी पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

कॉक्लीयर इंम्प्लाट शस्त्रक्रियेसाठी एक टिम तयार करण्यात आली. ज्यामध्ये पिडीयाट्रीशन, ॲनेस्थेशीयालॉजीस्ट, कार्डीयोलॉजीस्ट, क्लिनीकल ऑडीयोलॉजीस्ट याह चमूने अतिशय चोखपणे कार्य केले. जन्मजात हृदय विकार असलेल्या बालकाचे ऑपरेशन दरम्यान हृदयाचे ठोके नियंत्रीत ठेवणे गरजेचे असल्यामुळे ह्या टीमने योग्य ती काळजी घेतली. जिल्हयात प्रथम अशी शस्त्रक्रिया झाल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नरेश पाडवी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हुमणे, आय.एम.ए चे अध्यक्ष डॉ. विजय पटेल, डॉ. विशाल देसरडा, पूर्व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे आदींनी टीमचे अभिनंदन केले.

ह्या शस्त्रक्रियेसाठी धुळे येथील पिडीयाट्रीक भुलतज्ञ डॉ. जया दिघे, नंदुरबार येथील डॉ.किरण जगदेव, डॉ.गुलाब पावरा यांनी जबाबदारी पार पाडली. बालरोग तज्ञ डॉ. भरतकुमार चौधरी, कॉर्डियो लॉजिस्ट डॉ.प्रसाद अंधारे, क्लिनिकल ऑडियोलाजीस्ट डॉ. कल्पेश चौधरी, रेडिओलॉगिस्ट डॉ.गणेश पाकळे, पॅथोलॉजीस्ट डॉ. रविंद्र पाटील, राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रमाचे संयोजक मनोहर धिवरे, अमरसिंग वसावे, नितीन मंडलीक, आबिद रंगरेज, मौलाना जकारीया रहेमानी, हाफिज अखलाक साहब मो. जमील तसेच भगवती हॉस्पिटलचे स्टॉफ सिस्टर अलिशा गावीत, भाग्यश्री वसावे, अर्चना नाईक, शमूवेल व केमीस्ट जागृती कृष्ण पटेल ह्या सर्वाच्या अथक प्रयत्नाने ही शस्त्रक्रिया पार पडल्याचे डॉ. राजेश कोळी यांनी सांगितले.