नंदुरबार : महाविकास आघाडीकडून दाखल असलेल्या तीनही उमेदवारी अर्जांवर महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी हरकत नोंदवली आहे. शिवाय दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे डॉ. हिना गावित यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. यामुळे काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऍड. गोवाल पाडवी यांच्यासह काँग्रेसचे तीनही अर्जधारक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी १८ उमेदवारांनी २३ नामांकन अर्ज दाखल केले आहेत. नंदुरबार लोकसभा मतदार संघातून दाखल झालेल्या त्या उमेदवारी अर्जांची आज (दि.२६) छाननी झाली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीचे सर्व अधिकारी, अर्ज दाखल करणारे उमेदवार आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ऍड. गोवाल पाडवी, माजी मंत्री ऍड. के. सी. पाडवी आणि हेमलता पाडवी या तिन्ही जणांच्या उमेदवारी अर्जावर महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी जोरदार हरकत घेतली.
तिन्ही अर्जदार एकाच परिवारातील असून प्रत्येकाच्या अर्जात या परिवारातील सदस्य नेमके कोणावर अवलंबून आहे ? याविषयीचे खोटे उल्लेख आढळत असल्यामुळे हे अर्ज नामंजूर करावे, असे म्हणणे डॉ. हिना गावित यांनी मांडले होते.
तथापि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यावर दिलेला निर्णय मान्य नसल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून दाखल उमेदवारी अर्जांच्या विरोधात न्यायालयातून दाद मागणार आहेत; असे महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले. यामुळे काँग्रेस पक्षाकडून दाखल झालेली उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.