Nandurbar News : पं.स.मध्येच स्वीकारली लाच, दोघा कनिष्ठ सहाय्यकांना रंगेहाथ अटक

नंदुरबार : आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर पगारवाढ व सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते काढून बील मंजूर करुन देण्याच्या मोबदल्यात सात हजारांची लाच   स्वीकारणाऱ्या पं. स.ग्रामपंचायत विभागातील दोघा कनिष्ठ सहाय्यकांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईने  लाचखोर  गटात एकच खळबळ उडाली.

तक्रारदार हे लोकसेवक असून त्यांची सातारा ते नंदुरबार अशी आंतरजिल्हा बदली झाली आहे. त्यानंतर त्यांची पगार वाढ जुलै २०२१ ते मे २०२३ तसेच सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्त काढून बील मंजूर करुन देण्याच्या मोबदल्यात पंचायत समितीतील ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक दादाभाई पानपाटील यांनी  २६ जून रोजी सात हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तसेच कनिष्ठ सहाय्यक सुखदेव वाघ यांनी ८ ऑगस्ट रोजी तक्रारदाराकडून १ हजार ते २ हजार अशी मोघम स्वरुपात लाचेची मागणी केली.

त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान काल ८ रोजी लाचेची रक्कम स्विकारतांना श्री.पानपाटील यांना पंचायत समिती आवारातील वाहन पार्किंगजवळ पंचसाक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक पर्यवेक्षण अधिकारी राकेश चौधरी, सापळा अधिकारी समाधान वाघ तसेच पथकातील पोहेकॉ.विजय ठाकरे, पोना.देवराम गावित, संदिप नावाडेकर, पोना.अमोल मराठे, मनोज अहिरे तसेच पोलिस निरीक्षक माधवी वाघ, पोहेकॉ.विलास पाटील, मपोना ज्योती पाटील यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान, कोणीही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.