नंदुरबार : तोरणमाळ (ता.शहादा) येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिलीत शिक्षण घेणारा सहा वर्षे वयाच्या विद्यार्थ्याचा झोपेतच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. सहाय्यक प्रकल्प अधिकारी तळोदा व म्हसावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत विद्यार्थ्याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आदिवासी दुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील साबलापाणी येथील विद्यार्थी डेबा दिला पाडवी (वय ६) हा विद्यार्थी तोरणमाळ येथील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिलीत शिक्षण घेत होता. तो सोमवारी दुपारी अचानक आजारी पडला. या विद्यार्थ्यांचे पोट दुखत होते असे सांगण्यात आले. मात्र, मंगळवार डेबा पाडवी झोपेतच मृत झाल्याची माहिती समोर आली आणि आश्रमशाळा प्रशासनाला मोठा धक्का बसला.
यानंतर संबंधित आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या आई-वडिलांना कळल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी आश्रमशाळेत धाव घेतली. सदर प्रकार बघितल्यानंतर पालक व नातेवाइकांनी आश्रमशाळेच्या प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. जबाबदार अधिकारी आल्याशिवाय शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने म्हसावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे, के. सी. कोकणी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तळोदा यांनी तोरणमाळ येथे प्रत्यक्ष भेट देऊन पालकांची व नातेवाइकांची समजूत घातली. तसेच मृत विद्यार्थ्याबाबत पूर्ण चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिल्याने बुधवारी सायंकाळी उशिरा शवविच्छेदन झाले.
या घटनेत मात्र, विद्यार्थ्याच्या पोटात दुखू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते अन्यथा त्याच्या पालकांना का कळविले नाही, असा प्रश्न नातेवाईक करीत आहेत. दरम्यान, या सर्व गोष्टीची चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक प्रकल्प अधिकारी के. सी. कोकणी यांनी दिला आहे.