Nandurbar News : आता शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही; मुख्यमंत्री शिंदेंची गॅरंटी

नंदुरबार : शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघांमध्ये निधीबाबत दुरावा निर्माण झाल्याची भावना निर्माण झाली होती. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री डॉ. विजयकुमार गावित व माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्यात मोकळेपणाने चर्चा करण्यात आलेली आहे. यापुढे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची आम्ही जबाबदारी घेतलेली आहे. मागचं झालं गेलेलं आलेलं विसरून पुन्हा नवा अध्याय सुरू करून पंतप्रधान मोदींना पंतप्रधान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आमदार कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्या प्रसंगी त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी औक्षण करून स्वागत केले. बैठकीचे प्रास्ताविक शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर ताकद आहे. मंत्री डॉ. विजयकुमार गावित व माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील दुराव्याची चर्चा या अगोदरच व्हायला पाहिजे होती. परंतु, त्याला उशीर झाला होता. पण आता योग्य वेळी स्पष्ट व मोकळेपणाने चर्चा झालेली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कालपर्यंत झालेलं विसरून जावं. जे कार्यकर्ते इकडे तिकडे गेलेले असतील त्यांना जिल्हाप्रमुखांनी पुन्हा बैठक घेऊन बोलवावे.

यावेळी जिल्हाप्रमुख आ. निर्मला गावित, ॲड.राम रघुवंशी, किरसिंग वसावे, माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत, धुळ्याचे जिल्हाध्यक्ष सतीश महाले यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक,विविध गावातील सरपंच तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ढोल ताशांच्या गजर व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आमदार कार्यालयात लावण्यात आलेले संग्रहित फोटोंची भित्ती पत्रिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवण्यात आली.