Nandurbar News : उपविभागीय जलसंधारण कार्यालयातील लाचखोर अधिकाऱ्यारी गजाआड

नंदुरबार : लघु पाटबंधारे विभागातील केलेल्या कामांचे बिले काढण्यासाठी 20 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईने लाचखोर गटात प्रचंड खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी सन २०२२ सालात ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत लघु पाटबंधारे विभाग , जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत, शहादा तालुक्यात एकूण तीन कामे पूर्ण केली आहेत. नमूद तिन्ही कामांची रक्कम/बील काढून दिल्याच्या मोबदल्यात कनिष्ठ अभियंता, अतिरिक्त कार्यभार- उपविभागीय जलसंधारण अधिकारी, लघु पाटबंधारे विभाग , जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत पंचायत समिती, शहादा दिनेश केशवराव पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून एकूण ९५ हजार रुपयांची मागणी केली होती.

यापैकी वेळोवेळी ७५ हजार रुपये एवढी रक्कम दिनेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून या आधीच वेळोवेळी घेतली आहे. उर्वरित २० हजार रुपये एवढ्या रकमेसाठी दिनेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला होता. पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी दरम्यान तडजोडी अंती १९ हजार ५०० रुपये एवढी रक्कम दिनेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. दरम्यान, २५ रोजी दिनेश पाटील यांनी जिल्हा परिषद नंदुरबार येथील मुख्य प्रवेशद्वारा जवळ तक्रारदार यांच्याकडून १९ हजार ५०० रुपये एवढी रक्कम पंचसाक्षीदारां समक्ष स्वीकारताना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

अधिकारी पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार राकेश आ. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि माधवी वाघ , पोहवा विलास पाटील, मपोहवा ज्योती पाटील, पोहवा अमोल मराठे, पोहवा देवराम गावित, पोना संदीप नावाडेकर, व पोना मनोज अहिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.