नंदुरबार : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला असला तरी राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाला दुर्गम भागात मूलभूत सोयी सुविधा पोहचवण्यासाठी अद्याप देखील यश आलेलं नाही. परिणामी रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला चक्क पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील खुटवडा येथे गावाला रस्ता नसल्याने नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच एका गर्भवती महिलेला मध्यरात्री प्रसूती वेदना सुरू झाल्या. मात्र, रुग्णालयात जाण्यासाठी रस्त्या नसल्याने रात्रभर प्रसूती वेदना सहन कराव्या लागल्या.
सकाळ झाल्यावर नातेवाईक बांबूची झोळी बनवून गर्भवती महिलेसह नदी पार केली. यासाठी त्यांना साधारण आठ किलोमीटर पायपीट करावी लागली. यात महिलेला जास्त वेदना झाल्याने रस्त्यातच प्रस्तुती झाली. त्यानंतर महिलेसह नवजात बाळाला खाजगी वाहनाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या महिलेवर राजबर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
फक्त विकासाचे स्वप्न
करोडो रुपयांच्या विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाला लाजिरवाणी असणारी ही घटना आहे. गरज नसलेल्या भागात कोट्यावधी रुपयांचे रस्ते करण्याऐवजी खुटवडा सारख्या गावात रस्ते करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या दुर्गम भागात नेहमीच सुविधांअभावी नागरिकांना वानवा करावी लागत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यातच आता ही घटना समोर आल्याचे संताप व्यक्त करण्यात येत आहे.