नंदुरबार : सातबारा उतार्यावर नाव लावून देण्याच्या मोबदल्यात तीन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या अमलापाडा (ता.तळोदा) येथील तलाठीला एसीबीच्या पथके अटक केली. नंदलाल प्रभाकर ठाकूर (44) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तलाठ्याने नाव आहे. हा सापळा आज तळोदा तलाठी भवनात दुपारी 12.10 वाजेच्या सुमारास यशस्वी करण्यात आला. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील 47 वर्षीय तक्रारदार यांच्या जमिनीच्या गाव नमुना 7/12 महसूल अभिलेख्यावर नाव नोंद करून देण्यात आले असून तक्रारदार यांचे नाव सातबारा उतार्यावर लाऊन देण्याच्या व नाव लावून दिलेल्या कामाबाबत व नवीन नावाच्या सातबारा उतार्यावर सही शिक्का देण्याच्या मोबदल्यात तलाठी नंदलाल ठाकूर यांनी सोमवार, 26 तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्यानंतर तीन हजार रुपये देण्याचे ठरले मात्र तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा लावण्यात आला. तळोदा शहरातील तलाठी भवनात सोमवारी दुपारी 12.10 वाजता तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच आरोपी तलाठ्याला अटक करण्यात आल्याने महसूल विभागातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली.
हा सापळा नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माधवी समाधान वाघ व पोलीस निरीक्षक समाधान वाघ, विजय ठाकरे, विलास पाटील, ज्योती पाटील, देवराम गावीत, मनोज अहिरे , अमोल मराठे, चालक जितेंद्र महाले आदींच्या पथकाने यशस्वी केला.