नंदुरबार : येथील रेल्वे स्थानकावर थांबा नसलेल्या एक्स्पे्सने रेल्वेस्टेशन गॅस सिलेंडरसह विविध वेल्डींगचे साहित्य घेवून जाणाऱ्या ट्रॉलीला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने, या अपघातात कोणतेही नुकसान झाले नाही.
नंदुरबार रेल्वे स्थानकावर एकता नगर-रेेवा या एक्स्पे्सला थांबा देण्यात आलेला नाही. दरम्यान, काल दुपारी २.२५ वाजता रेल्वे स्थानकावरुन तासी सुमारे ११० ते १२० कि.मी. वेगाने जात असताना गॅस सिलेंडरसह विविध वेल्डींगचे साहित्य घेवून जाणाऱ्या ट्रॉलीला धडक दिली. रेल्वे जात असल्याचा सिग्नल देखील देण्यात आलेला होता. मात्र, या ठिकाणी शेडचे काम करणाऱ्या एका कामगाराने ट्रॉलीमध्ये गॅस सिलेंडरसह वेल्डींगचे कीट घेऊन जात असताना ट्रॉली रेल्वे मार्गावर अडकली. क्षणार्धात रेल्वे आली अन् गॅस सिलेंडरसह वेल्डींगचे कीट असलेल्या ट्रॉलीला धडक दिल्यानंतर सदरची ट्रॉली चेंडूप्रमाणे दूर फेकली गेली.
अपघातस्थळी वेल्डींग करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधानता राखून वेळीच गॅस सिलेंडर वेळीच बाजूला केल्याने अनर्थ टळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतेही नुकसान झाले नाही. असे असले तरी सदरची बाब गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत असून याची चौकशी होणे देखील गरजेचे आहे.
शिवाय सदरची बाब फारशी गांभीर्याने घेण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. काल सायंकाळी उशिरापर्यंत रेल्वे पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. स्टेशन मास्तर अमरेंद्र कुमार यांची भेट घेवून माहिती घेतली असता त्यांनी सदरची घटना घडली असली तरी त्यात फारसे नुकसान झालेले नाही. परंतु, या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. वरिष्ठ पातळीवर याप्रकरणी कळवणार असल्याचेही अमरेंद्र कुमार यांनी सांगितले.