नंदुरबार : सातत्याने होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या घटनानंतर पोलिसांनी तपास छडा लावला आहे. यात पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली त्यांच्याकडून तब्बल १५ मोटारसायकली जप्त केल्या असून एकूण १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नंदुरबार शहर पोलीस स्टेशनकडून मोटरसायकल चोरट्यांच्या विरोधात विशेष मोहीम उघडण्यात आली होती. त्यानुसार मोटरसायकल चोरी करणारे आरोपी दिनेश वसावे आणि राहुल भिल हे दोघे नंदुरबार शहरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या पंधरा मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. या आरोपींनी नंदुरबार पोलीस स्टेशन सोबतच सारंगखेडा, शहादा, मसावद पोलीस स्टेशनच्या हद्दीतही मोटरसायकल चोरी केल्या आहेत.
शिवाय सीमावरती भागातील गुजरात आणि मध्यप्रदेशमधूनही आरोपी मोटरसायकल चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींकडून अजून मोटरसायकली हस्तगत होण्याची शक्यता पोलीसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्याचसोबत शहरातून चोरीस गेलेले सहा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. एकूण या चोरट्यांकडून दहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून सदर गुन्ह्यांमध्ये त्यांच्यासोबत कोणाचा सहभाग आहे; याचा तपास पोलीस दलाच्यावतीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.