Nandurbar News : नंदुरबारमध्ये वाघाची भीती, वनविभाग सांगतोय ‘अफवा’

नंदुरबार : तालुक्यातील कोकणीपाडा येथे २०१८ मध्ये वाघ दिसून आला होता. घटनेला सहा वर्ष पूर्ण होऊनही या भागात अद्याप वाघ फिरत असल्याच्या अफवा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. यामुळे वनविभागाने पश्चिम पट्टयातील गावांमध्ये सध्या जनजागृती कार्यक्रम हाती घेतला असून बिबट्या आणि वाघाचे फोटो दाखवून फरक स्पष्ट करत ग्रामस्थांसोबत संवाद साधण्यात येत आहे.

या संवादादरम्यान वाघ आणि बिबट्या यांच्या वर्तनातील फरक समजावून देण्यात येत आहे. गेल्या महिनाभरापासून तब्बल सहा जणांचा बळी बिबट्याने घेतला आहे. यातून वनविभागाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. वनविभागाने तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील विविध भागात जनजागृतीला सुरुवात केली आहे. या पथकांकडून गुजरात हद्दीलगतच्या गावांमध्ये माहिती देण्यात येत आहे. वनपाल आणि वनरक्षकांकडून मोबाईलमध्ये बिबट्या आणि वाघाच्या स्वभाव, हालचाली, वर्तन, हल्ला करण्याची पद्धत आणि बचावाच्या पद्धती याबाबत माहिती देण्यात येत आहे.

वाघाची अफवा
नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गुजरात राज्यातून वाघ आल्याची घटना २०१८ मध्ये घडली होती. नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात १९८३ मध्ये वाघाची नोंद झाली होती. याठिकाणी आजही वाघाचा संचार असल्याचे बोलले जाते. सातपुड्यात मात्र ५० वर्षापूर्वी वाघ असल्याच्या नोंदी होत्या. परंतू गेल्या काही महिन्यांपासून सातपुड्यातील वडफळी ता. अक्कलकुवा या भागात वाघाचा संचार असल्याचे सांगण्यात येत आहे. याचीही सत्यता पडताळणी करणे आवश्यक आहे.