नंदुरबार : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. अशातच नंदुरबार जिल्ह्यात देखील आज दुपारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात नदी नाल्यांना मोठा पूर आला. तालुक्यातील दोन गावातील घर पाण्याखाली गेली आहेत तर सोरापाडा अलीविहीर, मौलीपाडा, इच्छागव्हाण, सिंगपूर शिर्वे या गावातील संपर्क तुटला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तळोदा अक्कलकुवा तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हाहाकार माजवल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान मंगळवारी (११ जुलै) रात्रीपासून पावसाचे संततधार सुरू असल्याने अक्कलकुव्यातील सिंगपुर बुद्रूक गावाचा पुलावरून पाणी वाहू लागले आहे.
ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प
अनेक भागातील शेतात पाणी शिरले. यामुळे मुसळधार पावसाने शेताला तलावाचे रूप आले आहे. तळोदा तालुक्यातील सोरापाडा गावात पाणी शिरल्याने रस्ते पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. बस सेवा बंद करण्यात आली आहे. या गावातील तीन चार घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे चांगलेच हाल झाले आहे.