नंदुरबार : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत प्रशासनाच्यावतीने उपाययोजना सुरू झाल्या आहे. आढावा बैठकींमध्ये पाणीटंचाई आणि चारा टंचाई ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देणे यासंदर्भात आराखडा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
जिल्ह्यात गेल्या वीस दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. तर मागील दिवसातही झालेला पाऊस समाधानकारक नसल्याने जिल्ह्यात ४० टक्के पावसाची तूट असून पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. योग्य वाढीच्या अवस्थेत पाऊस नसल्याने पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पुढे येत आहे.
जिल्ह्यात दोन लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर यावर्षी पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी जवळपास ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. मात्र तीन महिने संपत आले तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली असून पाऊस नसल्याने कापसाचे पिकाची वाढ खुंटली आहे. तर दुसरीकडे कडधान्य आणि इतर पिकांच्या फुलोरा अवस्थेतच पाऊस नसल्याने पिके जगवावीत कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. दमदार पाऊस नसल्याने नदी नाले कोरडे असून जमिनीची भूजल पातळी कमी झाली असून पिकांना पाणी द्यावे कसे कारण की विहीर आणि बोरवेल आटले आहेत.
कडधान्य आणि इतर पिक हातातून गेले आहेत. कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट येणार आहे. मात्र येणाऱ्या काळात उद्भवणारी टंचाई परिस्थिती लक्षात घेत प्रशासनाने आतापासून उपाययोजना करणे गरजेचे असून काढणे घोडे नाचविण्यापेक्षा शेतकऱ्यांना आत्ताच मदतीचा हात देऊन मायबाप सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी हीच अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.