( वैभव करवंदकर )
नंदुरबार : येथे सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित महासंस्कृती महोत्सव केवळ खर्च दाखवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते का ? शासनाने ह्या महासंस्कृती महोत्सवा वरती दोन कोटीचा खर्च करण्यासाठी परवानगी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. परंतु कमी वेळ असल्यामुळे नंदुरबार जिल्हा प्रशासनाने एक कोटीतच महासंस्कृती महोत्सवाचे नियोजन केले. ह्या कार्यक्रमासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले असते तर महाराष्ट्राच्या महासंस्कृतीत महोत्सव नंदुरबार जिल्ह्यात योग्य पद्धतीने पार पडला असता अशी सामान्य जनतेमध्ये चर्चा सुरू आहे.
नंदुरबार येथील यशवंत विद्यालयाच्या प्रांगणात दि. ६ ते १० मार्चदरम्यान महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपासून योग्य नियोजन करणे अपेक्षित होते. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नियमीत सांस्कृतिक कार्यक्रम घेणार्या संस्था, शाळा, महाविद्यालयातील पथके, यांना विश्वासात घेणे अपेक्षित होते. कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारावर २ लाख रुपये खर्चाची तरतूद होती. परंतू प्रशासनाकडून दोन ठिकाणी फलके लावण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाकडून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोणतेही नियोजन दिसून आले नाही. एवढेच काय या महोत्सवाबाबत साधी जनजागृतीदेखील करण्यात आली नाही. त्यामुळे या महोत्सवाचा पूर्णतः फज्जा उडाला. तसेच महासंस्कृती महोत्सव पाहण्यासाठी मोजकेच रसिक उपस्थित होते. त्यामुळे रसिकच येतील या आशेने खूप वाट पाहुन देखिल कार्यक्रमाला सुरुवात करण्यात झाली नाही. शासनाच्या परिपत्रकानुसार सुमारे ५ हजार खुच्र्यांचे नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र, मंडपात प्रत्यक्षात ९०० ते १००० खुर्चा व सुमारे १०० ते १२५ बाक टाकण्यात आले होते. असे असले तरी दुसऱ्या बाजूला रसिकांनी मात्र याकडे पाठ फिरवली होती. तसेच भव्य मंडप उभारुन कार्यक्रम मोठा दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी जनजागृतीचा अभाव, ढिसाळ नियोजनामुळे शासनाचा उद्देश फोल ठरत असल्याचे चित्र होते.
कार्यक्रमावर तब्बल २ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन काल दि.६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता होणार होते. परंतू प्रत्यक्षात रात्री उशिरापर्यंत मंडप व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होणार असलेला डोम तयार नव्हता. काल सायंकाळी ७.३० च्या सुमारास प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी महोत्सवाच्या ठिकाणी आले. त्यानंतर काही वेळाने मंत्री महोदयांचे आगमन झाले. त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम रात्री उशिरा सुरु झाला. तरीही डोम तयार नव्हता. यावेळी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस व काही स्टॉलधारकांव्यतिरिक्त इतर नागरिक उपस्थित नव्हते. उपस्थित नागरिकांची संख्या अत्यंत तोकडी होती. याठिकाणी ३० स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉलवरदेखील कोणीही खरेदीसाठी आलेले दिसले नाही. या स्टॉलधारकांनादेखील जबरदस्तीने स्टॉल लावण्यास सांगण्यात आल्याचे काहींनी सांगितले. त्यामुळे स्टॉलधारकांनीही नराजी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला सुरुवात होवून दोन दिवस झाले. मात्र, आज दुसर्या दिवशीही केवळ जनजागृतीअभावी व प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचा कुठलाही प्रतिसाद दिसून आला नाही. सांस्कृतिक कार्यक्रमासाठीदेखील स्थानिक कलावंत दिसून आले नाहीत. काही कलापथके परजिल्हयातून आले होते. या कलाकारांची कला पाहण्यासाठी मात्र नागरिकांनी पाठ फिरविलेली दिसून आली. मंडपात ठेवण्यात आलेल्या हजारो खूर्च्या रिकाम्या दिसून आल्या. यावरुन प्रशासनाने हा महोत्सव अत्यंत घाईगर्दीत घेवून केवळ शासनाकडून आलेला २ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यासाठीच आयोजित केला की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
महासंस्कृतीत महोत्सवाचा नियोजनासाठी वेळ कमी असल्यामुळे कमी खर्चात महासंस्कृतीक महोत्सव करण्यात आला. शासनाने दोन कोटी ऐवजी हा कार्यक्रम एका कोटीत करण्यात आला आहे. तसेच मी ट्रेनिंग साठी बाहेरगावी होती.
– मनिषा खत्री, नंदुरबार जिल्हाधिकारीमहासंस्कृती महोत्सवात स्थानिक कलावंतांना संधी मिळायलाच हवी या बाबत मी आग्रही होतो. मात्र सदर टेंडर नागपूर च्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला मिळाल्यानंतर सदर कंपनीने आधीच कोणते कार्यक्रम घ्यायचे ते ठरविले होते. स्थानिक कलावंतांना यात स्थान नव्हते. विचारणा केली असता आमच्या कार्यक्रमाचे नियोजन पूर्ण झाले असुन त्या नियोजनात कोणताही बदल करता येणार नाही असे उत्तर मिळाले. दोन कोटी रुपयाच्या या महासंस्कृती महोत्सवात नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांना स्थानच नाही हे अत्यंत खेदजनक आहे.
– नागसेन पेंढारकर, नाट्यकलावंत
नंदूरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून नंदूरबार जिल्ह्याला मोठा सांस्कृतिक वारसा लागलेला असतांना यशवंत विद्यालयाच्या प्रांगणात सुरु असलेल्या महासंस्कृती महोत्सवात स्थानिक संस्कृती व कलाकारांना कोणत्याही प्रकारचे स्थान नसणे ही जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती व लोककलावंताची अवहेलना आहे. त्यामुळे हा महोत्सव खरंच जिल्ह्यातील लोककला व लोककलावंतांचे सन्मान करणारा नसून हा फक्त देखावाच आहे असे दिसून येते.
– भिमसिंग वळवी , मुख्य संयोजक , आदिवासी मौखिक साहित्य परिषद