Nandurbar News : बनावट सोन्याची माळ, भाजीपाला विक्रेत्याला सव्वापाच लाखांचा गंडा

नंदुरबार : भाजीपाला विक्रेत्याला बनावट सोन्याची माळ देत त्याची पाच लाख २१ हजारांत फसवणूक झाल्याची घटना तळोदा येथे उघडकीस  आली. या प्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

अशोक झावरू गवळे व त्यांच्या पत्नी सुरेखाबाई गवळे (रा. सुशीला श्रीराम पार्क, तळोदा) हे भंसाली प्लाझासमोर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दोन अनोळखी त्यांच्या दुकानावर रोज भाजीपाला घेऊन जात असल्याने त्यांची गवळे दाम्पत्याशी ओळख होती.

याच ओळखीतून २१ ऑगस्ट रोजी संशयितांनी दवाखान्याचे काम सांगत गवळे दाम्पत्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्या बदल्यात पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असल्याचे सांगून धुळे येथे ते घेण्यासाठी यावे लागेल, असे सांगितले.

अशोक गवळे हे धुळे येथे गेले असता संशयितांनी त्यांना बनावट सोन्याचे मणी देऊन २६ ऑगस्ट रोजी २१ हजार घेतले. नंतर पुन्हा ३० रोजी गवळे यांना हिरे वैद्यकीय महावि- द्यालय, धुळे येथे बोलवून त्या ठिकाणी त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेत बदल्यात पुन्हा बनावट सोन्याची माळ देऊन फसवणूक केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तळोदा पोलिस ठाण्यात अशोक गवळे यांच्या फिर्यादीवरून दोघा अनोळखी व्यक्त्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.