नंदुरबार : सातपुड्याचा दुर्गम भागात असलेल्या बिलगाव (ता.धडगाव) येथील उदय नदीवर प्रसिद्ध असलेल्या बाराधारा धबधबा पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या परिसरात दुर्घटना वाढल्याने हा निर्णय घेतला असून पर्यटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
सातपुड्याचा नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारा उदय नदीवरील 12 मुखी धबधबा हा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. उदय नदीच्या प्रवाहा धारांच्या स्वरूपात प्रवाहित झाला आहे. नदीपात्रात पडणाऱ्या पाण्याचा प्रवाहामुळे धबधब्यांजवळ पाण्याचा अंदाज न आल्याने येथे दुर्घटना घडल्याचा अनुभव ग्रामस्थांच्या गाठीशी आहे.
गत तीन वर्षात पाच ते सहा पर्यटकांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी या धबधब्याच्या परिसरात पर्यटकांना जाण्यासाठी बंदी घातली आहे. एकीकडे वर्षा पर्यटनासाठी सातपुड्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असली तरी सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये असलेल्या धबधब्यांवर सुरक्षा सुविधांअभावी पर्यटकांना बंदी घालावी लागली आहे.
दरम्यान, जोपर्यंत नदीपात्रात आणि नदीकाठावर सुरक्षा उपायोजना केल्या जात नाही तोपर्यंत ही बंदी राहणार असल्याचा ग्रामस्थांनी सांगितले.