Nandurbar News : मरणानंतरही यातनाच; स्मशानभूमीअभावी उघड्यावरच अंत्यसंस्कार

नंदुरबार : ”इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…” या कवी सुरेश भटांच्या कवितेतून माणसाचे जिवन खरं तर खूपच खडतर आहे. मृत्यूनंतरच त्यातून सुटका होते याचा प्रत्यय येतो. मात्र माणसाच्या मृत्युनंतरही सुटका नशिबी नाही असे म्हणण्याची वेळ सध्या वडफळी (ता. अक्कलकुवा) गावातील ग्रामस्थांवर आली आहे. एकीकडे शहरात मशीनच्या वापराने एका बटनावर प्रेताची व्हिलेवाट लावली जाते, मात्र गावखेड्यात अजूनही स्मशानभूमीच नसल्याने किती मरण यातना भोगाव्या लागत असल्याचे विदारक चित्र या घटनेवरून लक्षात येते.

५ हजार लोकवस्तीच्या वडफळी (ता. अक्कलकुवा) गावातील स्मशानभूमीत शेड आणि रस्ता नसल्याने ग्रामस्थांना नदीपलीकडे असलेल्या जागेत बंधाऱ्यावरून जावे लागते. या ठिकाणी विधी सुरू असताना पाऊस सुरू झाल्याची अश्रू ढाळणाऱ्या आप्तस्वकीयांचे हाल होत आहेत.

गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या वडफळी येथे सुविधांची वानवा आहे. यात स्मशानभूमीत शेड, काँक्रिट रस्ता आणि इतर सुविधा नाहीत. गावालगतच्या नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थ नाल्यात बांधलेल्या बंधाऱ्यावरून दुसऱ्या काठाला जात आहेत.

पावसाळ्यात एखाद्या कुटुंबावर दुखद प्रसंग ओढावल्यास ग्रामस्थांसमोर मोठे संकट उभे राहते. स्मशानभूमीत शेड नसल्याने ताडपत्री आणि छत्र्यांचा आधार घेत विधी पूर्ण करावे लागत आहेत.

याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही योग्य ती कार्यवाही झालेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गावापासून एक किलोमीटर अंतरावर स्मशानभूमी आहे. यामुळे याठिकाणी जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात यावा. नदीवर पुलाची निर्मिती, निवारा शेड, बैठक व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.