Nandurbar News : सातपुड्यात भोंगऱ्या बाजाराची धामधूम; उद्यापासून होणार सुरुवात

नंदुरबार : सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे जतन करणाऱ्या भोंगऱ्या सणास सोमवारपासून उत्साहात सुरुवात होणार  आहे. होळीचे पांग फेडण्यासाठी आणि भोंगऱ्या बाजाराचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आदिवासी बांधव सज्ज झाले आहेत.
होळी पूजनासाठी पूजासाहित्य खरेदीसाठी भरणाऱ्या भोंगऱ्या बाजारात आदिवासी वाद्य, आदिवासी पेहराव, नृत्याचे सांस्कृतिक दर्शनही घडते. रोजगारासाठी बाहेर गेलेले आदिवासी बांधव यानिमित्ताने स्वगृही परततात.

सातपुड्याच्या पर्वतरांगेत वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांचा ‘होळी’ सण हा दीपोत्सवापेक्षा कमी नसतो. होळीची चाहूल लागताच आदिवादींना भोगंऱ्या बाजाराचे वेध लागतात.

सातपुड्यातील आदिवासींचा होळी हा प्रमुख सण आहे. मात्र होळीपूर्वी आठवडाभर चालणारा भोंगऱ्या हाट विशेष आकर्षण ठरतो. खरेतर हा हाट होळी सणासाठी लागणारे पूजा साहित्य खरेदीसाठी असतो.

स्थानिक पातळीवर रोजगार नसल्याने आदिवासी समाज वर्षभर स्थलांतरीत असतो. मात्र होळी सणासाठी सर्वजण आपापल्या घरी येतात. यामागे सर्व नातेवाईकांची भेट होणे हादेखील प्रमुख उद्देश आहे.

होळीच्या दुसऱ्या दिवसापासून ‘मेलादा’ सणाला सुरवात होते. विविध वेशभूषा साकारणे, महिनाभर कडक व्रताचे पालन करणे, यासाठी बावा,बुद्या, कावी, रिछडा आदी पात्र करतात.