नंदुरबार : येथील जी. टी. पाटील महाविद्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात ३२ विद्यार्थ्यांची अंतिम, तर ५२६ विद्यार्थ्यांची पुढील मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. मेळाव्यासाठी एक हजार १२३ तरुणांनी नोंदणी केली होती. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्ष आणि नंदुरबार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जी. टी. पाटील महाविद्यालय यांच्यातर्फे २१ फेब्रुवारीला झालेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात ३२ विद्यार्थ्यांची अंतिम, तर ५२६ विद्यार्थ्यांची पुढील मुलाखतीसाठी निवड करण्यात आली.
मेळाव्यात ३८ कंपन्या सहभागी होत्या. त्यात जळगाव, नाशिक, धुळे आणि गुजरातमधील कंपन्यांचा समावेश होता. मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते झाले. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते.
या वेळी तालुका विधायक समिती नंदुरबार संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, साहाय्यक आयुक्त विजय रिसे, प्राचार्य प्रा. महेंद्र रघुवंशी, शंकर जाधव, प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. रमेश सरदार, उपसमन्वयक डॉ. उज्ज्वल पाटील, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी. चौधरी, उपप्राचार्य डॉ. एस. यू. पाटील, डॉ. एस. पी. पाटील, टी. जी. पाटील, प्लेसमेंट अधिकारी सोनाली दायमा, आंतरवासिताचे समन्वयक संदीप कुमार उपस्थित होते. विजय रिसे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. माधव कदम यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रमेश सरदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयक केशव परदेशी आदींनी सहकार्य केले.